वाळू माफियांच्या विरोधात संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:16 AM2018-05-14T01:16:26+5:302018-05-14T01:16:26+5:30
अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/अंबड : अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या उपोषणाला चौदा दिवस पूर्ण झाले असून, त्याची दखल ना महसूल ना पोलीस प्रशासाने घेतल्याने ते आता आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाच्या तयारीत आहेत.
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील वाळू उपशाची अनेक प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. काही ठिकाणी पोलीस तसेच महसूलच्या भरारी पथकावर हल्ले करून त्यांना जखमी करण्यात आले आहे. हे सर्व घडत असताना यात दोन महिन्यापूर्वी महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाच्या बोगस पावत्या देऊन सर्रासपणे वाळूचा उपसा सुरू असल्याने शासनाची लाखो रूपयांची रॉयल्टी बुडत आहे. ही राष्ट्रीय संपत्तीची हानी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून पोलीस निरीक्षक देविदास शेळके तसेच पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यातील वाळूचा ट्रक सोडण्यावरून जो मोबाईल मधिल संवाद आदी अनेक पुरावे प्रशासनाला चित्राल यांनी दिले मात्र त्याची दखल घेतली नाही.
या विरोधात चित्राल यांनी अंबड येथील तहसील समोर एक मे पासून उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणालाही प्रशासन जुमानत नसून, चित्राल यांना कुठलेच ठोस आश्वासन न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या विरोधात आ. बच्चू कडू यांनी आता लक्ष घातले आहे. ते देखील या मुद्यावर पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याचे त्यांनी अंबड दौऱ्यादरम्यान नमूद केले होते. एकूणच महसूल, पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून वाळूचे व्यवहार सुरू असल्याने त्यावर आळा बसवणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.