सर्वसामान्यांना काँग्रेसच न्याय देऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:38 AM2018-02-16T00:38:22+5:302018-02-16T00:38:29+5:30

भाजपाने शेतकरी व सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून प्रत्येक घटकाला फक्त काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो, अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

 Congress can give justice to commoners | सर्वसामान्यांना काँग्रेसच न्याय देऊ शकते

सर्वसामान्यांना काँग्रेसच न्याय देऊ शकते

googlenewsNext

जालना : भाजपाने शेतकरी व सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून प्रत्येक घटकाला फक्त काँग्रेस पक्षच न्याय देऊ शकतो, अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन विधानसभेचे विरोधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जालना येथील हॉटेल बगडियामध्ये गुरुवारी काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस कमिटीेचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, खा. हुसेन दलवाई, नानासाहेब पटोले, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, डॉ. शंकरराव राख, प्रा. वसंत पूरके, युवक प्रदेशचे विश्वजित कदम, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, नगराध्यक्षा विमल जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, विजय कामड सुषमा पायगव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा विमल आगलावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पंचनामा केला. ते म्हणाले की, नागरिकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर खरे उतरण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागावे. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य आले होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर मंडळी भाजपाकडे गेली. आज त्यांना त्यांची चूक लक्षात येऊ लागली आहे. भाजपाच्या मंडळींनी मोठे स्वप्न दाखवून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंडळीना प्रवेश करण्यास भाग पाडण्यात आले. आता काँग्रेस पक्षातील आऊटगोईग बंद झाली असून इनकमिंग सुरू झाल्याचे ते म्हणाले. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी हे परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी काम करत असून, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला संकटात टाकले आहे. ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही, ज्यांनी इंग्रजांची गुलामगिरी केली, ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवत असून, तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यास विरोध करणारे तिरंगा यात्रा काढतात, हा भाजपचा ढोंगीपणा आहे. भाजपच्या सत्ताकाळात इंधनाच्या किमती वाढवून सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिलांना काँग्रेसने दिलेले माहितीचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, अन्न सुरक्षा, माहिती, शिक्षणाचा अधिकार हे भाजप सरकारने काढून घेतले आहेत. जनतेत भाजपाविरोधात तीव्र संताप असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात परिवर्तनासाठी कामाला लागा, असे मोहन प्रकाश म्हणाले. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रा. वसंत पूरके, खा. राजीव सातव, हुसेन दलवाई, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, नाना पटोले, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.
प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख अभिजीत सपकाळ यांनी सादरीकरण केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र राख यांनी आभार मानले. यावेळी विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. या शिबिराला ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव राख, रामप्रसाद बोराडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, माजी आ. धोंडीराम राठोड, माजी आ. संतोष दसपुते, माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, बाबूराव कुलकर्णी, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हरिश रोगे, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, सचिव आबा दळवी, ज्ञानदेव पायगव्हाणे, नवाब डांगे, अब्दुल हफीज, शाह आलम, प्रा. सत्संग मुंडे, राजेश राठोड, प्रदेश प्रतिनिधी राजेंद्र राख, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर सत्तार, मोहन इंगले, शीतल तनपुरे, वैभव उगले, दिनकर घेवंदे, बाबूराव सतकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
जातीयवादी विचारांना सरकारकडून पाठबळ
राजकीय स्वाथार्साठी समाजात जातीयवादाचे विष पेरण्याचे काम काही संघटना करीत आहेत. सरकारकडून या प्रवृत्तींना पाठबळ मिळते आहे. सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी काँग्रेसचा विचार तळागाळापर्यत पोहोचवून या प्रवृत्तींना रोखण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. या सरकारच्या काळात शेतक-यांनी संप केला. महिला, तरूण, विद्यार्थी, कामगार, नोकरदार, दलित, अल्पसंख्याक, कामगार, शेतकरी असा समाजातील एकही घटक या सरकारच्या कामावर समाधानी नाही. लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत लोक आपल्याला मते देणार नाहीत, हे कळून चुकल्याने समाजात जातीय विष पेरून राजकीय फायदा उचलण्याचा सत्ताधा-यांचा डाव असून, भीमा कोरेगावचे प्रकरण याचे उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली.
----------------
संघर्षासाठी सज्ज राहावे-गोरंट्याल-
सत्ताधा-यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी जालना विधासनभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. सरकारची धोरणे ही शेतकरी व्यापारीविरोधी असून, शासनाच्या निर्णयामुळे सर्वच घटक त्रस्त आहेत. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागवे, असे माजी आ. गोरंट्याल या वेळी बोलताना म्हणाले.
--------------
अनुकूल वातावरण तयार करणार- जेथलिया
कार्यकर्ता प्रशिक्षणाचा पहिला टप्पा संपल्यानंतर १६ एप्रिलपासून काँग्रेसची मतदारसंघनिहाय यात्रा सुरू होणार आहे. या दरम्यान शासनाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांबाबत जनजागृती केली जाईल. संपूर्ण जिल्हा पिंजून काढून जिल्ह्यात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण केले जाईल.

 

Web Title:  Congress can give justice to commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.