काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसले नड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:23 AM2019-08-29T01:23:01+5:302019-08-29T01:23:47+5:30
विरोधक स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्धे नेते जेलमध्ये असून, अर्धे नेते जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत, आम्ही प्रथम देश आणि नंतर पक्षाला महत्त्व देणारे असून, विरोधक मात्र, प्रथम स्वत:चा स्वार्थ पाहतात असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी बुधवारी येथे आयोजित महाजनादेश यात्रेच्या जाहीर सभेत केला. याचवेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचा नामोल्लेख न करता, चाचा-भतीजाचे राजकारण कसे चालते यावर टिपणी करतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आता कलम ३७० रद्द केल्या प्रकरणी उपरती झाल्याचे नड्डा यांनी यावेळी नमूद केले.
भाजपची महाजनादेश यात्रा बुधवारी सायंकाळी जालन्यात दाखल झाली. येथील डॉ. फ्रेजर बॉईज हायस्कूलच्या मैदानावर यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यावर नड्डा हे प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पहिल्यांदा जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी ७५ दिवसात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखला, तसेच काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याचे सांगून त्यामुळे तेथील जनतेचा विकास होऊन भारतीय राज्य घटनेतील आरक्षण तेथे लागू होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्त करून चौफेर विकास साधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी युनोमध्ये ज्यावेळी काश्मीरचा मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितल्यावर खा. राहुल गांधी यांना आपण पाकिस्तानची भाषा बोलत असल्याची उपरती झाली, आणि नंतर त्यांनी हा आमच्या देशाअंतर्गतचा मुद्दा असल्याचे मान्य करत केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याचे नड्डा यांनी सांगितले. ज्यावेळी संसदेत ३७० कलम रद्द झाले होते, त्यावेळी काँग्रेसने केवळ व्होटबँकेला धक्का लागू नये म्हणून त्याला विरोध केल्याचा आरोपही नड्डा यांनी केला. मोदींनी मुस्लिम महिलांसाठी डोकेदुखी असलेला तिहेरी तलाकचा मुद्दा निकाली काढल्याने त्यांच्या वरील अन्याय दूर झाल्याचे सांगितले. आयुष्यमान योजनेचे कौतुक हे परदेशात होत असल्याचे सांगून यामुळे आता पर्यंत ४२ लाख लोकांना त्याचा लाभ झाल्याचा दावा केला. तसेच जालन्यातील ड्रायपोर्टचे काम ७० टक्के झाल्याचे सांगून, जालन्यातील बियाणे उद्योगात १८० कोटी रूपयांची गुंतवणूक झाल्याचेही सांगितले. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही विचार मांडले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जि.प. अध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा व्यासपीठावर येऊन सत्कार केला.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव, सुरजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल, देविदास देशमुख, सिध्दीविनायक मुळे आदींची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले.
महाजनादेश यात्रेतून आम्ही केलेला विकास जनतेसमोर मांडत आहोत, लोकसभे प्रमाणेच विधानसभेतही जनता आम्हाला आशीर्वाद देईल, असा विश्वास व्यक्त करून मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी सिंचनासह पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी भरीव निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. मराठवाडा वॉटरग्रीडसाठी चार हजार कोटी रूपयांची निविदा निघाली असल्याचे सांगितले.
कोकणातील समुद्रात वाहून जाणारे २५ टीएमसी पाणी देखील गोदावरीत वळवून दुष्काळावर मात करू, असे ते म्हणाले. पाच वर्षातील आमचा विकास आणि आघाडी सरकारचा पंधरा वर्षातील विकास याची तुलना होऊच शकत नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध अनुदानातून शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी रूपये दिल्याचे त्यांनी सांगितले. जालन्यासाठी तुम्ही कितीही निधी मागा, आमची तिजोरी कधीही उघडीच राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
विरोधकांच्या यात्रेला प्रेतयात्रेचे रूप : दानवे
केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात जी कामे केली आहेत, ती जनतेपर्यंत नेण्यासाठी आमची महाजनादेश यात्रा आहे. परंतु या यात्रेला विरोध करण्यासाठी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या यात्रा काढल्या आहेत, त्यांना प्रेतयात्रेचे स्वरूप आले असल्याची गंभीर टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी करून त्यांच्या यात्रांची खिल्ली उडवली. महाराष्ट्रासह जालन्याच्या विकासासाठी हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी आणून रस्ते, पाणीयोजना तसेच अन्य विकास कामे केल्याचे दानवे यांनी यावेळी नमूद केले. आगामी काळात चौदाशे एकरवर जालन्याचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील ८१ कोटी गरीब जनतेला केवळ दोन रूपये किलोने गहू आणि तांदूळ आम्ही देत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.