मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2022 06:55 PM2022-12-04T18:55:28+5:302022-12-04T18:56:47+5:30
काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या चाचणीसाठी रविवारी दुपारी जालन्यात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरलेल्या गौणखनिज प्रकरणात मॉन्टो कॉर्लो कंपनीला ३०० कोटी माफ केले जातात, तर दुसरीकडे केवळ तीन हजार रुपये वीज बिल थकीत असले तरी शेतीचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार थांबवावा. केंद्र शासनाने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्याने समाजावर अन्याय झाला आहे.
यामुळे शासनाने बंद केलेली अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नारायण वाढेकर, तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, शेतकरी रतन शिंदे, असंघटित कामगार काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख शमशोद्दीन, जिल्हा सचिव गौतम लांडगे, आदींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. यामुळे प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.
शेतकऱ्यांनीही मांडल्या व्यथा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा ताफा येणार असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जुन खोतकर स्वागत कार्यक्रमस्थळी आले होते. त्यावेळी एका शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीसाठी दिलेला मावेजा कमी असून, त्यात लक्ष घालावे, अशी मागणी केली. दानवे यांनी पाहणी केली जाईल सांगितले, तर सत्कार स्वीकारल्यानंतर निघालेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर एका शेतकऱ्याने अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याची व्यथा मांडली. मात्र, ताफ्यातील गर्दीत मंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद संबंधित शेतकऱ्याला मिळाला नाही.