वाळूमाफियांशी संगनमत भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:50 AM2018-03-14T00:50:53+5:302018-03-14T00:50:57+5:30
वादग्रस्त आॅडियो क्लिपमुळे जिल्हाभरात चर्चेत आलेले अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची मंगळवारी पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांची नियुक्ती झाली आहे. शेख यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : वादग्रस्त आॅडियो क्लिपमुळे जिल्हाभरात चर्चेत आलेले अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांची मंगळवारी पोलीस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रफिक शेख यांची नियुक्ती झाली आहे. शेख यांनी मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारला.
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक सोडविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंंग माने यांच्याशी झालेल्या मोबाईलवरील संभाषणाच्या आॅडियो क्लिपमुळे पोलीस निरीक्षक देविदास शेळके व उपनिरीक्षक माने यांच्यातील संभाषणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांना दिले आहेत. क्लिपमधील आवाज नक्की पोलीस निरीक्षक शेळके व उपनिरीक्षक माने यांचाच आहे का, याची चौकशी सुरू असून याबाबतचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान, शेळके यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी रुजू झालेले रफिक शेख यांनी या पूर्वी बदनापूर, वाहतूक शाखा, मंठा, नियंत्रण कक्ष या ठिकाणी सेवा बजावली आहे. प्रत्येकाच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जाईल याकडे लक्ष देणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
आॅडिओ क्लीपमध्ये पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी वरिष्ठ अधिका-यांच्याही नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे चौकशीत त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.