जालन्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना कॉन्स्टेबल गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 07:34 PM2018-03-27T19:34:24+5:302018-03-27T19:34:24+5:30
चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
जालना : चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र तुळशीराम वेलदोडे (४८ रा. रामनगर पोलीस कॉलनी) असे लाच स्वीकारणार्या कॉन्स्टेबलचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावर नूतनवसाहत भागात देशी दारूचे दुकान आहे. वडिलांच्या निधनामुळे देशी दारू दुकानाचा परवाना तक्रारदारास आईच्या नावे करायचा होता. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यातून चारित्र पडताळणी अहवालाची आवश्यकता असल्याने तक्रारदार या संबंधीचे काम पाहणार्या गोपनीय शाखेतील राजेंद्र वेलदोडे यास २० मार्चला भेटले. चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी वेलदोडे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. कुठलाही गुन्हा दाखल नसताना अहवालासाठी पैसे कशाला लागतात, अशी विचारणा तक्रारदाराने केली. तेंव्हा वेलदोडे याने दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. आता पाच हजार रुपये द्या व उर्वरीत पाच हजार काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. नाईलाजास्तव तक्रारदाराने पाच हजार रुपये दिले. मात्र, उर्वरीत रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून कदीम जालना पोलीस ठाण्यात सापळा लावून वेलदोडे यास तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.