बांधकामाचे साहित्य गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:35 AM2019-06-27T00:35:07+5:302019-06-27T00:35:28+5:30
मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांत संताप आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने धामना नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन महिन्यांपासून खडी, गिट्टी, सळई इ. साहित्य आणून टाकले आहे. याला तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाचे दिवस असल्याने नदीच्या प्रवाहात साहित्य वाहून जाण्याची भीती लोकमतने १४ जून रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.
सोमवार आणि मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने पुलाच्या बांधकामासाठी आणलेली खडी, वाळू आणि लोखंडी सळई पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पुलाच्या बांधकामाला आता जास्तीचा विलंब होणार असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी केली असून दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. तीन महिन्यांपासून धामना नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले होते. परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ताच नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असल्याने या मार्गावरुन अनेकांना ये- जा करावा लागतो. पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडल्याने बाजारकरूंची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यामुळे बाजाराला येणा-या दुकानदारांची संख्या रोडावली. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि खान्देशला जोडणारा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर पुढे भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव, धावडा, शिवणा यानंतर अजिंठा गाव लागते. मात्र, पुलाचे बांधकाम रखडल्याने या मार्गावरुन ये- जा करण्यास अडचणी येत आहेत. तसेच परिसरातील शेतक-यांची गैरसोय होत आहे.