बियाणाचे नमुने घेण्यात दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:29 AM2018-08-23T00:29:28+5:302018-08-23T00:29:51+5:30
पेरणीच्या हंगामापूर्वी बियाणे प्रमाणित असल्याची खातरजमा करण्यासाठी सत्यतादर्शक बियाणांचे नमुने निरीक्षकांनी काढणे अनिवार्य आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी तसे निर्देशही दिले आहेत. मात्र नामांकित कंपनीच्या बियाणांची नमुने घेण्यावर जास्त कल असून खाजगी नमुने घेण्याचा कल असते. यामध्ये कृषी विभागाकडून दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे.
गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पेरणीच्या हंगामापूर्वी बियाणे प्रमाणित असल्याची खातरजमा करण्यासाठी सत्यतादर्शक बियाणांचे नमुने निरीक्षकांनी काढणे अनिवार्य आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी तसे निर्देशही दिले आहेत. मात्र नामांकित कंपनीच्या बियाणांची नमुने घेण्यावर जास्त कल असून खाजगी नमुने घेण्याचा कल असते. यामध्ये कृषी विभागाकडून दुजाभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. परिणामी यामध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
बियाणे गुणवत्ता आणि बाजारातील सर्व बियाण्यांचे नमुने तपासणी आवश्यक आहे. यासाठी दिलेल्या उद्दिष्टाशिवाय शेतक-यांच्या तक्रारी असतील किंवा भरारी पथकाद्वारे ज्या ठिकाणी संशयास्पद वाटेल तेथील बियाणांचे नमुने घेऊन तपासणी आवश्यक आहे. मात्र याला अनेकदा निरीक्षकांद्वारे बगल दिली जात आहे.
याचा थेट विक्रेत्यांनाच फायदा होत असल्याचे अनेक प्रकारामध्ये स्पष्ट झाले आहे. निरीक्षकांच्या नियोजनाअभावी बियाणांचे प्रातिनिधिक नमुने काढले जात नसल्याचे वास्तव आहे. निरीक्षकाद्वारे बºयाचदा शासनअंगीकृत कंपनीचे बियाणे नमुने जास्त घेतले जातात.
गुणवत्ता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत रस्त्यावरील दुकानामधील निविष्ठाचे नमुने घेण्याकडेच निरीक्षकांचा कल असतो. दुर्गम, छोट्या गावामधील दुकानातील निविष्ठाचे नमुने घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे बियाणाचे नमुने घेण्यामध्ये हेराफेरी होत असल्याने याचा फायदा बियाणे कंपन्यांना होऊन शेतकºयांची फसवणूक होते. निविष्ठा नमुना नापास होणार नाही, याकडे निरीक्षकांचा कल असतो. विशेष म्हणजे याबाबत राज्याच्या कृषी आयुक्तांनी कृषी विभागाला खबरदारी घेण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु या सूचनेला केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. सदोष बियाणामुळे अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच बोंडअळीसारखे प्रकार समोर आल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
(आणखी वृत्त दोनवर)
वेगवेगळ्या गुणवत्ता नियंत्रणाव्दारे एकाच ठिकाणचे बियाणे नमुने घेतले जातात, ज्या उत्पादकांच्या आणि दुकानाद्वारे नमुने घेतले नाही. त्याच ठिकाणचे नमुने घेतले जावेत, या सूचनेला अनेकदा हरताळ फासला जातो. घेण्यात येणारे नमुने हे वेगवेगळ्या लॉटचे व कंपनीचे घेण्यात यावे, असे कृषी आयुक्तांच्या सूचना असताना एकाच कंपनीचे आणि लॉटचे नमुने वारंवार घेतले जात असल्याने लक्ष्यांकपूर्तीसाठी उद्दिष्टपूर्तीला बगल दिली जात आहे.
२०१८ मध्ये ४३ नमुने अप्रमाणित
बियाणामध्ये ५१२ नमुने काढण्याचे लक्ष्यांक होते. त्यापैकी ५४९ नमुने काढण्यात आले. त्यामध्ये १९ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले.
रासायनिक खतामध्ये ५५९ नमुने काढण्याचे लक्ष्यांक होते. त्यापैकी ४५३ नमुने काढण्यात आले. यामध्ये १७ नमुने अप्रमाणित निघाले.
कीटकनाशकामध्ये २१५ नमुने काढण्याचे लक्ष्यांक होते. या तुलनेत १६८ नमुने घेण्यात आले. यामध्ये ७ नमुने अप्रमाणित असल्याचा निष्कर्ष आहे.