कोजागिरीनिमित्त विचारमंथन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:03 AM2019-10-13T00:03:21+5:302019-10-13T00:03:38+5:30
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये समाजहित जोपासण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी सायंकाळी विविध विषयांवर विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विजयअण्णा बोराडे, कृषीभूषण भगवानराव काळे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक वृंद आणि वर्षभरात कृषी विज्ञान केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाला सातत्याने सहभागी होणारे आदींच्या पुढाकारातून ही कोजागिरी पौर्णिमा कृषी विज्ञान केंद्रामध्ये साजरी केली जात आहे.
कोजागिरीच्या दिवशी सायंकाळी सात वाजल्यापासून येथे जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांचा एकमेकांशी परिचय होतो. स्नेहभोजन होते. यानंतर तासाभराचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतो. कार्यक्रम झाल्यानंतर सर्व चालू- घडामोडींवर आधारित जाणवणा-या समस्येविषयी चार- पाच वेगवेगळे विषय ठेवण्यात येतात. या माध्यमातून सर्वानुमते एक विषयावर विचार मंथन होते. यावेळी प्रत्येक जण स्वत:ची भूमिका मांडतात. हा मोलाचा संदेश कोजागिरीला उपस्थित असलेला प्रत्येक जण आपल्या गावी घेऊन जातो. यानंतर केलेल्या कामावर कृतीतून अंमलबजावणी केली जात आहे. मागील पंधरा वर्षांपासून हा उपक्रम कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राबविण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ब्रह्मदेव येवले यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शिवाय धुलिवंदनाचा अनोखा कार्यक्रमही येथे वेगळ््या पद्धतीने साजरा केला जातो.