मटकाकिंग बंगवरील हद्दपारीची कारवाई कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:15 AM2018-02-23T00:15:46+5:302018-02-23T00:16:04+5:30
मटका प्रकरणात जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या येथील कमलकिशोर पुसाराम बंग याच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मटका प्रकरणात जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या येथील कमलकिशोर पुसाराम बंग याच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेने जालना शहरातील १५ मटकाबहाद्दारांवर तीन महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईला मटका किंग कमलकिशोर पुसाराम बंग याने मुलीच्या लग्नाचे कारण सांगून विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. लग्नाचा मुद्दा असल्याने विभागीय आयुक्तांनी बंग याच्यावरील कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र, स्थगिती मिळविल्यानंतर बंग याने पुन्हा शहरात मटका सुरू केला. त्यामुळे बंग याच्या हद्दपारीच्या कारवाईवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती अर्ज गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी विभागीय आयुक्तांकडे केला होता. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासमोर सुनावणीत गौर यांनी बंग याने पुन्हा मटका व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विभागीय आयु्क्तांनी बंग याच्या हद्दपारीच्या कारवाईवरील स्थगिती उठवत पोलिसांचा आदेश कायम ठेवला आहे.