अभियांत्रिकीचा तिढा कायम, आयटीआयचे प्रवेश सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:23 AM2019-06-21T00:23:24+5:302019-06-21T00:23:52+5:30
अभियांत्रिकी, कृषी तसेच बीफार्मच्या प्रवेशासाठीचे सेतू केंद्र कुचकामी ठरले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अभियांत्रिकी, कृषी तसेच बीफार्मच्या प्रवेशासाठीचे सेतू केंद्र कुचकामी ठरले आहेत. या प्रवेशासाठीची वेबसाईट दिली होती, तिचे सर्व्हर नेहमीच डाऊन राहिल्याने अद्यापही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा श्रीगणेशा किमान जालना जिल्ह्यात तरी होऊ शकला नाही. तर या उलट आयटीआयमध्ये प्रवेशासाठी लगबग सुरू असून, आज पर्यंत जवळपास ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी झाली आहे.
जालना जिल्ह्यात विचार केल्यास उच्व व तंत्र शिक्षण विभागाने यंदा सेतू सुविधा केंद्र मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नागेवाडी येथे सुरू केले होते.
याला आता आठवडा लोटला आहे. असे असतानाच या केंद्रावर अद्याप रजिस्ट्रेशन न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे. अनेक पालकांनी या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. असे असूनही त्यात कुठेच फरक पडला नाही. त्यामुळे पुन्हा हे प्रवेश जुन्या पध्दतीने घेण्याची नामुष्की तंत्र शिक्षण विभागावर येणार असल्याचे त्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मन:स्ताप
नवीन पध्दत लागू करताना तिच्या यशस्वितेची चाचणी घेणे आवश्यक होते, परंतु तसे न करता एका खासगी एजन्सीला हे कंत्राट देऊन राज्य सरकारने आपले हात झटकले आहेत.
याचा मोठा मन:स्ताप विद्यार्थ्यांना होत असल्याचे दिसून आले. दररोज शेकडो विद्यार्थी व पालक यांना जालन्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ये-जा करावी लागत आहे.