विज्ञानाच्या क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने महिलांचेही योगदान संस्मरणीय- स्मिता लेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:56 PM2020-02-27T23:56:54+5:302020-02-27T23:57:42+5:30
आजच्या विज्ञान युगात जवळपास कुठल्याच क्षेत्रात महिला या पुरूषांच्या मागे नाहीत, मग ते संशोधनाचे क्षेत्र असो की, अवकाशातील भरारी यात त्या कुठेच कमी नाहीत. हे डॉ. स्मिता लेले यांच्या सारख्या अनेक महिलांनी सिध्द केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निसर्गात स्त्री-पुरूष असा भेद कधीच नव्हता. एकवेळ महिला या पुरूषांपेक्षा अधिक सक्षम आणि तत्पर होत्या, परंतु नंतर हळूहळू पुरूषी वर्चस्व वाढत जाऊन महिला केवळ चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिल्या. परंतु जसजसा काळ बदलत गेला, तसतशी महिलांमधील चमक जगाला कळू लागली. त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जवळपास कुठल्याच क्षेत्रात महिला या पुरूषांच्या मागे नाहीत, मग ते संशोधनाचे क्षेत्र असो की, अवकाशातील भरारी यात त्या कुठेच कमी नाहीत. हे डॉ. स्मिता लेले यांच्या सारख्या अनेक महिलांनी सिध्द केले. लेले या भारतातील पहिल्या केमिकल इंजिअर म्हणून हिंदूस्थान लिव्हरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून त्या रूजू झाल्या होत्या. विज्ञान दिनाचे औचित्य साधून त्यांनी लोकमतशी बातचित केली. महिलांनी विज्ञानवादी व्हावे असा संदेशही त्यांनी दिला.
शुक्रवारी विज्ञान दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त येथील आयसीटीच्या प्रमुख संचालिका डॉ. स्मिता लेले यांच्याशी संशोधनाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. त्या म्हणाल्या निसर्गात स्त्री आणि पुरूष असा मतभेद कधीच नव्हता. एकवेळ महिला या पुरूष अर्थात नर जातीच्या प्राण्यांच्या तुलनेत अधिक सक्षम आणि सहनशील तसेच बुद्धिमानही होत्या. याचे उदाहरणच द्यायचे झाले झाले तर सिंहिणीचे देता येईल. सिंह हा जरी जंगलचा राजा म्हणून ओळखला जात असला तरी तो सहसा शिकार करत नाही. खऱ्या अर्थाने शिकार करते सिंहीणच, हे वास्तवही त्यांनी यावेळी सांगितले. विज्ञानात पहिल्या शास्त्रज्ञ म्हणून नाव घेतले जाते, ते मॅरी क्यूरी यांचे. त्यांना दोन नोबेल पारितोषिक मिळाली आहेत.
देशात जानकी अंमल, असीमा चटर्जी, रोहिणी गोडबोले, अदिती पंत यांनी संशोधन तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करून महिलांचा सन्मान वाढवला आहे.
भारतात स्वातंत्र्यानंतर विचार केल्यास पहिल्या शास्त्रज्ञ म्हणून आयआयएसी मध्ये साधारणपणे १९६० मध्ये डॉ. कमला सोहनी यांना संधी मिळाली होती. त्या नंतर १९७७ मध्ये मला हिंदुस्थान लिव्हरमध्ये केमिकल इंजिनिअर अर्थात संशोधन अभियंता म्हणून संधी मिळाली. आज देशातील स्थिती बदली आहे.
संशोधनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, अनेक महिला आणि युवती या वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून संशोधनात आपले नावलौकिक करत आहेत. त्यामुळे महिला आणि युवतींनी आपण केवळ महिला आहोत, हा न्यूनगंड बाजूला ठेवण्याचा संदेशही लेले यांनी विज्ञान दिनानिमित्त दिला.
स्वयंपाक घर एक प्रयोगशाळा
प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाक घर म्हणून एक छोटीशी प्रयोगशाळाच असते. तेथील वेगवेगळे पदार्थ हे मानवी आरोग्यासाठी पोषक असतात. त्यात उदाहरणार्थ हळद, मोहरी तसेच अन्य पदार्थांचा समावेश असतो.
मोहरीच्या फोडणीला पूर्ण तडका बसून, मोहºया या तड-तड वाजल्याच पाहिजे, असे जुन्या महिलांचा आग्रह असतो, तो योग्यच आहे. कारण मोहरीला असलेले टरफल हे माणसाचे पोट पचवू शकत नाही, ते पचवण्यासाठीची रासायने मानवी शरीरात नसल्याचे डॉ. लेले यांनी सांगितले.