अडचणींचे संधीत रुपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:22 AM2019-01-06T00:22:10+5:302019-01-06T00:23:15+5:30
नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : जगाच्या बाजारपेठेत पूर्वी आपल्या देशाचा वाटा ३३ टक्के म्हणजे एक तृतीयांश एवढा होता. आजघडीला मात्र आपल्या देशाचा वाटा घसरून केवळ ३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, हे आता आपल्याला केवळ म्हणून चालणार नाही तर सर्वांनी आपल्या कृतीतून ते सिध्द करून दाखविण्याची गरज आहे. नोकरी, पॅकेजच्या मागे न लागता आलेल्या अडचणींचे संधीत रुपांतर करून उद्योजक व्हा आणि देशाच्या समृद्धीत भर घालण्याचे महत्वाचे कार्य करा, असे आवाहन औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक प्रसाद कोकीळ यांनी केले.
कै. दत्ताजी भाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ समारोहानिमित्त गुरुवारी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाच्या वतीने अंबड येथील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात उद्योजक प्रसाद कोकीळ यांचे ‘उद्योजगतेकडून संपन्नतेकडे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भाला तर प्रमुख पाहुणे म्हणून द्वारकादास मंत्री यांच्यासह अॅड. आर. आर. कुलकर्णी, केदार मंत्री, तुकाराम तौर, दीपक
ठाकूर, द्वारकादास जाधव, रमेश शहाणे, गंगाधर वराडे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना कोकीळ म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत अमेरिका, चीन, युरोप आदी देशांचा वाटा वाढत चालला आहे. मात्र आपल्या देशाची होत असलेली घसरण आपण रोखू शकलो नाही. कारण आपली मानसिकता कमकुवत झाली आहे. आपण पूर्वी बलवान, सुखी, समृद्ध, संपन्न होतो, हेच विसरून गेलो आहे. आपल्या देव-देवता सोन्याने सजलेल्या संपन्न असतांना तसेच आपल्या संस्कृतीत संपन्नता भिनलेली असतानाही आपण संपन्नतेकडे वाटचाल करताना एवढी कच का खात आहोत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.