आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांनी समन्वय ठेवावा- उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 01:08 AM2019-05-22T01:08:29+5:302019-05-22T01:08:56+5:30
मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपत्तीचे निवारण करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येत्या मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून आपत्तीचे निवारण करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले.
मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना वायाळ बोलत होते. बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.एम.कडलग, जिल्हा शल्य चिकित्सक एम.के.राठोड तहसीलदार जे.डी.वळवी, महेश सुधळकर, चंद्रकांत शेळके, कृषी विस्तार अधिकारी झणझण पाटील, जलसंधारण अधिकारी डी.बी.एकतपुरे, शिक्षणाधिकारी एस.एस.चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
वायाळ म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. त्यामुळे आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळता येईल. सर्व तहसीलदार कार्यालये, पोलीस ठाणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, महावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करावा. सर्व नियंत्रण कक्ष नियमितपणे कार्यरत राहणे आवश्यक असून त्याबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. नियंत्रण कक्ष बंद असल्याचे आढळ्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. तालुका व गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्थापना करुन त्यांच्या बैठका घेण्यात याव्यात. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी निवा-याची व्यवस्था करण्यावरही चर्चा करण्यात आली.