"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 01:10 AM2024-07-06T01:10:36+5:302024-07-06T01:14:36+5:30
ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.
पवन पवार -
वडीगोद्री (जालना ) : अंतरवली सराटी येथे भाजप नेते खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा, अशी आमची भावना असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे.
चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वीही मी जरांगे यांची भेट घेतली होती. जरांगे यांच्या सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे. मधल्या काळात आचार संहिता असल्याने काही प्रश्न सुटले नाही. यामुळे मी पुन्हा आज जरांगे यांच्या भेटीला आलो आहे. यावेळी, गंभीर गुन्हे वगळता, इतर किरकोळ स्वरूपाचे आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाली. हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण, अशी देखील मागणी आहे, यावरही यावेळी चर्चा झाली.
फोनवर मंत्री शंभु राजे देसाई आणि जरांगे यांचे बोलणे झाले आहे. जेवढ्या लवकर हा विषय संपेल तेवढे चांगला आहे. शासन स्तरावर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लागले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. आजची भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व मागण्यांसंदर्भात पाठपुरावा करणार आहे. शासन आणि जरांगे यांच्यात मी समन्वयाची भूमिका पार पाडत आहे, असे चव्हाण म्हणाले.
दरम्यान, अशोक चव्हाण हे सरकार, समाज की माध्यम म्हणून आले? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील. बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
सगे सोयरेची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करावी. आजची चर्चा सविस्तर झाली असून, त्यांच्या लक्षात आले आहे की, ओबीसींना धक्का लागणार नाही. मुलींचं मोफत शिक्षण सरकारने केलं, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही आमची लढाई बंद नाही, 288 आमदार पाडायचे की, लढवायचे हे सुरू आहे. आम्ही सरकारचे काम करत आहोत. शांतता राज्यात राहावी हे सरकारचं काम आहे, आणि हेच आम्ही करत आहोत. आम्ही शांतता रॅली काढत आहोत. आमच आरक्षण आम्हाला द्या, मला राजकारणात ढकलू नका. नाही दिलं तर, पुढचं सांगत नाही, असेही जरांगे यावेळी म्हणाले.