कॉपीमुक्त अभियान अयशस्वीच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:26 AM2019-03-21T00:26:03+5:302019-03-21T00:26:37+5:30
शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपी करणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कॉपीचा हा आकडा परीक्षा व्यवस्थेत सुधारणा झाली नसल्याचे दशर्वित असून, मागील वर्षाच्या तुलनेत या आकड्यात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी कॉपी मुक्त अभियान अयशस्वीच होत असल्याचे दिसत आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये कॉप्या रोखण्यात परीक्षा मंडळाला अपयश आले आहे. जिल्ह्यातील अनेक केंद्रावर सर्रास कॉपी करताना विद्यार्थी आढळत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा अभियान मोडीत निघाल्याचे कॉपी प्रकरणांवरून समोर आले आहे. मंडळाने परीक्षेसाठी जिल्ह्यात ६ भरारी पथक तयार केले होते. या पथकाने जिल्ह्यामध्ये कॉपी प्रकरणांमध्ये कारवाई केलेला आकडा ७७वर गेला आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षेत ५२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने कॉपीमुक्त अभियान अयशस्वी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
शिक्षक विद्यार्थ्यांना घडवणारा महत्त्वाचा व्यक्ती आहे. त्यासाठी वर्षभर विद्यार्थ्यांना शिक्षक धडे गिरवितात. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचे समोर आले आहे.
केंद्रावर असुविधा
जालन्यात घेण्यात आलेल्या अनेक परीक्षा केंद्रावर एकाच बाकावर दोन परीक्षार्थी बसविण्यात आले होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना अस्वच्छ पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना कॉपी करणे सोपे जात होते.
मंठा तालुक्यातील रेणुका विद्यामंदिर येथे मराठी विषयाचा पेपर सुरु असताना परीक्षा केंद्रावर दोन परीक्षार्थी दुस-याच्या नावावर परीक्षा देतांना पथकाला आढळून आले होते. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका, प्रवेशपत्र जप्त करण्यात आल्या होत्या. चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर झाली होती व्हायरल
मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असताना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये सारांश दिलेला असतो तो वाचूनच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठीही विद्यार्थ्यांकडून मराठीच्या पेपरला कॉपी करण्याचे प्रकार उघड झाले. ही मराठीची प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपवर व्हायरल झाली होती.