जालना बाजारात आवक वाढूनही तूर, मक्याच्या भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:29 PM2018-12-31T12:29:21+5:302018-12-31T12:31:10+5:30
बाजारगप्पा : बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे
- संजय देशमुख ( जालना )
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूर आणि मक्याची आवक सरासरी दोन हजार पोती आहे, मात्र आवक वाढताच दरामध्ये अनुक्रमे २०० आणि १०० रुपयांची घसरण झाली आहे. ज्वारी, बाजरी, सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असली तरी या तिन्हींचे दर स्थिर आहेत.
जालना जिल्ह्यात कापसाचे दर कोसळले असून, हमी भावपेक्षा ५०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी होत आहे. मकर संक्रंतीनिमित्त बाजारात गुळाची आवक बऱ्यापैकी असली तरी भाव हे गेल्यावर्षीच्या तुलनेत ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. बाजारपेठेत बाजरी २०० पोती, ज्वारी ३०० पोती, नवीन तूर २००० हजार पोती आणि मकादेखील २००० पोती आवक आहे. मक्याचे भाव हे १५०० ते १६०० रुपये असून, यात शंभर रुपयांची घसरण झाली आहे.
ज्वारीच्या भावातही २०० रुपयांची घसरण असून, तुरीचे दरही सरासरी २०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे बाजारातून तेजीची आशा करणे आता अवघड झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तूरडाळ, चनाडाळची आवक बऱ्यापैकी असली तरी यातही सरासरी शंभर ते ३०० रुपयांची घसरण झाली आहे.
बाजारपेठेत सीसीआयने कापूस खरेदी केंद्र सुरू केले असून, हमीभाव ५ हजार ४०० रुपये आहे. मात्र, हा भाव उच्च दर्जाच्या कापसाला देण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस दर्जेदार नसल्याचे सांगून त्यांना कमी भाव मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे. ग्रामीण भागात परिस्थितीमुळे मेटाकुटीला येत शेतकरी कमी किंमतीत पशुधन विक्री करीत आहेत.
सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रात २८ दिवसांत केवळ ३ हजार ५०० क्विंटल एवढा कमी कापूस खरेदी झाला आहे. या केंद्रावर कापूस खरेदी करताना त्यात प्रारंभी किती ओलावा आहे, हे मोश्चर मशीनद्वारे तपासून घेतला जात आहे. त्यात ८ ते १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असल्यास तो कापूस खरेदी केला जातो. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसात या टक्केवारीपेक्षा कितीतरी पट अधिक ओलावा दिसून येत असल्याने कापूस परत करण्याची वेळ केंद्रावर येत असल्याचे दिसून येते.
सोयाबीनची आवक आता मंदावली असून, ती केवळ ५०० पोती येत आहे. याला ३ हजार ३०० रुपयांचा दर मिळत आहे. साखरेचा कोटा गेल्या महिन्यांच्या तुलनेत एक लाख टनांनी कमी केला असून, साखरेचे दर स्थिर आहेत. यंदा जानेवारी महिन्यासाठी केंद्र सरकारने १८ लाख टनांचा कोटा जाहीर केला आहे.
जालन्यातील बाजारपेठेत गुळाची आवक चांगली असली, तरी भाव पाहिजे तसे नसल्याचे गूळ असोसिएशनचे सचिव गोविंद सराटे यांनी सांगितले. संक्रांत अद्याप पंधरा दिवस दूर असली तरी तिळाचे भाव हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले असून, किरकोळ बाजारपेठेत १८० रुपये किलोने विक्री होत आहेत.