कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:11 PM2020-11-14T17:11:46+5:302020-11-14T17:13:34+5:30

कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले.

Corona also saw a surge in bullion markets | कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

कोरोनातही सराफा बाजारात धनवर्षाव

googlenewsNext
ठळक मुद्देदागिन्यांसह महालक्ष्मीच्या प्रतिमेला मागणी

जालना : कोरोनाचे मळभ दूर झाल्याचे चित्र शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी दिसून आले. धनत्रयोदशीला सोने  आणि चांदी हे मौल्यवान धातू खरेदीला अनन्यसाधारण महत्व हिंदू संस्कृतीत आहे. हे  महत्व लक्षात घेऊन जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये कोट्यवधी रूपयांची सोने खरेदीची उलाढाल झाल्याचे दिसून आले. 

दिवाळीनिमित्त गेल्या आठवडाभरापासून बाजार गर्दीने फुलला आहे. यात नवीन कपडे, पूजेचे साहित्य, तसेच सोने, चांदी, रेफ्रीजरेटर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, यासह मोबाईलच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. विविध दुकानदारांनी तसेच उत्पादक कंपन्यांनी खरेदीवर भरमसाठ डिस्काऊंट  दिल्याने देखील खरेदीचा उत्साह बाजारात दिसून आला. कोरोनाने संकटात सापडलेले उद्योग दिवाळीच्या तेजाने जणू काही उजळून निघाले असल्याचे बाजारात फेरफटका मारल्यानंतर दिसून आले. दरम्यान शुक्रवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम  ५१ हजार २०० एवढे होते. तर चांदीचे दर हे ६४ हजार प्रति किलो एवढे होते. धनत्रयोदशीला एक ग्रॅम का हाेईना सोने खरेदी करण्यास मोठे महत्व आहे.

आजच्या दिवशी मौल्यवान वस्तुंची खरेदी केल्यास वर्षभर चणचण जाणवत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आज सहा ते सात महिने शुकशुकाट असलेल्या सराफा बाजारात पाय ठेवायला जागा नसल्याचे चित्र होते. गाडी पार्किंग करण्यासाठी अनेकांची कसरत झाली. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्याने मोठे संकट आले होते. परंतु सरकारने जाहीर केलेली मदत खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून का होईना सोने, चांदी खरेदीचा मुहूर्त साधला. शेतकऱ्यांचे पांढरे सोने असलेला कापूस शेतकऱ्यांच्या घरात पोहचला आहे. परंतु सध्या कापूस खरेदी करण्यात येत नसल्याने तो घरातच पडून आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजारात तेजी 
सोने-चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी मुहूर्त असतो. तो मुहूर्त यंदाही नागरिकांनी साधला आहे. सोन्या- चांदीच्या दरात दिवाळीच्या तोंडावर घसरण झाल्याने देखील खरेदीत वाढ झाल्याची माहिती सुखदेव ज्वेलर्सचे ओंकार गिंदोडिया यांनी सांगितले. वाहन खरेदीकडे अनेकांचा कल आहे. अनेकांनी वाहनांची बुकिंग केली असली तरी ते नवीन कार, दुचाकी पाडव्याच्या दिवशी घरी नेणार असल्याचे कमिटमेंट केले असल्याची माहिती अंबरीश बजाजचे संचालक रघुनंदन लाहोटी यांनी सांगितले. 

घर खरेदीला प्राधान्य 
राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कमी केले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये घर-खरेदी विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. तसेच नवीन घरांच्या प्रकारात बंगलोज, वन, टू. बीएचके फ्लॅट खरेदीला चांगला प्रतिसाद आहे. विविध बँका तसेच वित्तीय संस्थांनी गृह प्रकल्पांसाठी त्यांच्या व्याजदरात कपात केली असून, होमलोन एका दिवसात मंजूर होत असल्याने ग्राहकांचा कल नवीन घर खरेदीकडे आहे. 
- अभय पाथरवालकर, संचालक, विठ्ठला गृहप्रकल्प, जालना

Web Title: Corona also saw a surge in bullion markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.