कोरोनामुळे शासनाच्या कर्जमाफी प्रक्रियेला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:02 PM2020-03-21T23:02:18+5:302020-03-21T23:03:25+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रक्रियेलाही ब्रेक लागला आहे. शहरी, ग्रामीण भागातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्रांवरील बायोमेट्रिक बंद करण्यात आहे. या योजनेंतर्गत आजवर जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ५५० कर्जखात्यावर तब्बल ७१५ कोटी ४२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.
महाआघाडी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या दोन याद्यांमध्येच जिल्ह्यातील लाभार्थ्यांपैकी अर्ध्याहून अधिक लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. आजवर बँका, सोसायट्यांकडून १ लाख ६२ हजार २६८ शेतकऱ्यांची माहिती शासकीय पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पैकी १ लाख ३० हजार १५८ शेतकऱ्यांची नावे दोन याद्यांमध्ये आली आहेत. आधार प्रमाणिकरणानंतर १ लख १७ हजार ५५० कर्जखात्यांवर ७१५ काटी ४२ लाख रूपये जमा झाले आहेत. तर अद्यापही जवळपास ६० हजार शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
३१ मार्चपर्यंत स्थगिती आदेश
ही प्रक्रिया गतीने सुरू असतानाच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. जालना जिल्ह्यातही जवळपास १० संशयित आढळून आले. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील आपलं सरकार केंद्र, सीएससी केंद्र, महा आॅनलाईन केंद्रावरील बायोमेट्रिक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या केंद्रावर शासकीय कामांसाठी नागरिकांची होणारी गर्दी, बायोमेट्रिकमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरच कर्जमाफीची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.