कोरोनाने रोजगार हिरावला; कौटुंबिक हिंसाचारही वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:29+5:302021-03-07T04:27:29+5:30
जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या ...
जालना : मागील काही दिवसांपासून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावले गेले. त्यामुळे खर्चासाठी पैसे नसल्याने व इतर कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील सततची दुष्काळी परिस्थिती व उपलब्ध नसलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक यासह इतर राज्यांत कामाला गेले होते. परंतु, मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. यामुळे बहुतांश कंपन्यांनी कामगारांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे बाहेरगावी गेलेले सर्वच जण आपल्या गावी परतले. यामुळे अनेकांची सामाजिक, आर्थिक स्थितीदेखील बिघडली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले होते. यामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पत्नीला मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्याची मागणी करणे, पैसे नसल्याने महिलेस मारहाण करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली होती. टोकाचे वाद झाल्यानंतर महिला तक्रार, महिला व मुलांकरिता साहाय्य कक्ष असलेल्या या विभागात तक्रारी येतात. या ठिकाणी पती-पत्नी तसेच कुटुंबाची समजूत काढून तडजोड केली जाते. त्यामुळे अनेकांचे संसार पुन्हा सुरू होतात, तर काहींचे दुभंगतात. मात्र, वाढत असलेली प्रकरणे चिंतेचा विषय बनत आहेत. गतवर्षात महिला तक्रार निवारण कक्षाकडे तब्बल ५६९ प्रकरणे दाखल झाली होती. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. १७ प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली.
या कारणांमुळे होतात तक्रारी
घरखर्च भागविण्यासाठी पैसे नसल्याने महिलेस मारहाण करून माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जाते. मुलगा होत नाही. तसेच दुचाकी, घर खरेदी करण्यासाठी पैसे आणण्याची मागणी केली जाते.
१४३ प्रकरणांत तडजोड
जालना येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे मागील वर्षभरात ५६९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील १४३ प्रकरणांत तडजोड करण्यात आली. तर, ९३ प्रकरणे पोलीस ठाण्यात गेली. त्याचबरोबर १७ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. २१८ प्रकरणे प्रलंबित आहेत. मागील दोन महिन्यांत १२४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.