जंतनाशक गोळ्यांच्या वाटपास कोरोनाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:33+5:302021-03-04T04:58:33+5:30
जालना : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
जालना : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेला कोरोनाचा अडसर ठरत असला तरी आवश्यक ती साधने वापरत आणि खबरदारी घेत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत.
जिल्ह्यातील जवळपास सहा लाख बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाच्या वतीने ठेवण्यात आले आहे. लहान मुलांच्या पोटात जंत हाेऊ नयेत, रक्तक्षय होऊ नये, मुलं कुपोषित होऊ नयेत, मुलांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. मुलांनी गोळ्या कशा पद्धतीने घ्याव्यात, यासह मुलांची काळजी कशी घ्यायची याची माहितीही हे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना देत आहेत.
सर्व पालकांनी आपल्या मुलांना गोळ्या द्याव्यात
कोरोनाचे रूग्ण आढळत असले तरी मुलांना जंतनाशक गोळ्या देणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आवश्यक ती खबरदारी घेऊन लहान मुलांना गोळ्यांचे वाटप करीत आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना या गोळ्या वेळेत खाऊ घालाव्या.
- डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
दोन हजार कर्मचाऱ्यांची फौज
जिल्ह्यातील जवळपास दीड हजारावर आशा, एएनएम, सुपरवायजर, कर्मचारी आदी दोन हजारांवर अधिकारी, कर्मचारी या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हाभरात काम करीत आहेत. त्यांनी कोरोनातील सूचनांचे पालन करावे, याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात घरोघरी गोळ्यांचे वाटप सुरू
आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी घरोघरी जाऊन लहान बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करीत आहेत. शिवाय मुलांची काळजी, कोरोनातील सूचनांबाबतही या मोहिमेमध्ये जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात आले.
लाभार्थी संख्या
०१ ते ०६ वर्षे १६५३५६
०७ ते १९ वर्षे ४३४६४४