कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:13 PM2020-03-26T23:13:02+5:302020-03-26T23:13:22+5:30

दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.

Corona prolongs literary, cultural events | कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनाचे परिणाम एकूणच संपूर्ण मानवी जीवनावर या - ना त्या कारणाने पडले आहेत. व्यापार, उद्योगा प्रमाणेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रही यामुळे भरडले गेले आहे. गर्दी न करणे हाच प्रभावी उपाय या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा पर्याय आहे. त्यामुळे दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.
जालन्यातील साहनी परिवाराकडून प्रसिध्द कवी राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दु:खी यांच्या स्मरणार्थ राज्य काव्य पुरस्कार देऊन कवी, लेखकांना सन्मानित करण्यात येते. गेल्या २१ वर्षापासून देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी देण्यात येत होता. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक विनित साहनी तसेच कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली. आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक नामवंत कवी, लेखक आणि चित्रकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कवितेच्या पाडव्याच्या कार्यक्रमाची अल्पावधीतच राज्य पातळीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण होऊन त्याला एक मानाचा सन्मान म्हणून गणले जाऊ लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच हा कार्यक्रम होईल असे साहनी यांनी सांगितले. जालन्यातील दुसरा एक महत्त्वाचा आणि तेवढाच लोकप्रिय झालेली चैत्रपालवी ही संगीत मैफल होय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मैफिल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रूक्मिणी परिवाराचे सदस्य सुरेश मगरे यांनी दिली. या मैफिलीतही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावून जालनेकर रसिकांची संगीताची भूक भागविली आहे. हा कार्यक्रम आम्ही यंदाही तेवढ्याच चांगल्या कलाकाराला निमंत्रित करून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते रद्द झाल्याने आमच्यासह जालनेकर रसिकांचाही हिरमोड झाला आहे.
२० वर्षात दु:खी काव्य पुरस्काराचे हे आहेत मानकरी
बलवंत धोंगडे, गणेश विसपुते, वृषाली किन्हाळकर, राम दुतोंडे, कैलास भाले, श्रीकांत देशमुख, फ.मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, मनोज बोरगावकर, रामदास फुटाणे, राजेंद्र दास, प्रवीण बांधेकर, लोकनाथ यशवंत, भगवान देशमुख, अनुराधा पाटील, विष्णू सूर्या वाघ, अरूणा ढेरे, सुरेश सावंत आणि महेश केळुसकर, राजन गवस, सौमित्र (किशोर कदम) आदींचा यात समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अव्याहत सुरू ठेवण्यासाठी जालना शहरातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच साहित्यप्रेमी, शायर यांची मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे विनित साहनी म्हणाले.
स्व. नवल सहानी यांच्या प्रेरणेतून हा कवितेचा पाडवा प्रारंभ झाला. त्यावेळी ‘उर्मी’ चे प्रा. जयराम खेडेकर, कवि संतोष जेधे यांच्यासह अन्य साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी हा उपक्रम पुढे नेला. सद्यस्थितीत विनित साहनी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांच्या मदतीने हा उपक्रम सुरू आहे.
या राज्य काव्य पुरस्कारात अनेक महान चित्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचाही यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम शब्द आणि शिल्पांचा संगम म्हणून ओळखला गेला.

Web Title: Corona prolongs literary, cultural events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.