Corona Vaccine : धक्कादायक; कोरोना लसीचे वेगवेगळे डोस दिल्याने एकाला रिॲक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 02:46 PM2021-05-11T14:46:45+5:302021-05-11T14:49:24+5:30
Corona Vaccine : परतूर तालुक्यातील खांडवी येथील प्रकार
परतूर (जालना) : एका ७२ वर्षीय व्यक्तीने पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतल्यानंतर दुसरा कोविशिल्डचा घेतल्याने त्यांना तीन दिवसांनी रिॲक्शन आल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील खांडवी येथे रविवारी उघडकीस आला. दत्तात्रय वाघमारे असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे.
वाघमारे यांनी २२ मार्च रोजी परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांना दुसरा डोस १९ एप्रिल ते ३ मेदरम्यान घ्यावा, असे सांगण्यात आले होते. ३० एप्रिल रोजी श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने त्यांना कोविशिल्डचा डोस देण्यात आला. तीन दिवसांनंतर वाघमारे यांना हाताला पुरळ, तीव्र ताप व अशक्तपणा जाणवला. यामुळे कुटुंबीय घाबरले होते, असे दत्तात्रय वाघमारे यांच्या मुलाने सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी सांगितले.
कुठलाही धोका नाही
घडलेल्या या प्रकारानंतर त्या रुग्णाची भेट घेतली असता, त्याला कुठलाही त्रास नाही. दोन्ही लसींमध्ये एकच घटक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नाही. - सय्यद जाहेद, तालुका आरोग्य अधिकारी, परतूर