corona virus : केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यास महाराष्ट्राचा त्याला पाठिंबा : राजेश टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 02:05 PM2021-05-04T14:05:24+5:302021-05-04T14:08:48+5:30
corona virus : देशपातळीवरही लॉकडाऊनविषयी चर्चा करण्यात येत असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
जालना : देशपातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. याविषयी निर्णय घेतला गेल्यास महाराष्ट्राचा त्याला पाठिंबाच असेल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच सीरम इन्स्टिट्यूट ही राज्यातील कंपनी असल्यामुळे आदर पूनावाला यांनी राज्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.
जालनाचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसह खरीप हंगामाचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात कोरोनावरील लसीचे उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्राचे एक अतूट नाते आहे. या संस्थेत उत्पादित होणारी लस खरेदी करण्यास राज्य शासन तयार आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे इतर लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा करीत आहेत. याशिवाय अमेरिकेतील तज्ज्ञांशीही ऑनलाईन संवाद साधला आहे. त्यातही त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची गरज व्यक्त केली. त्यामुळे देशपातळीवरही लॉकडाऊनविषयी चर्चा करण्यात येत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
‘स्पुटनिक’ची खरेदी करणार
देशात उपलब्ध होत असलेल्या लसींसोबत परदेशातील लस खरेदी करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. रशियात बनविण्यात आलेली स्पुटनिक ही लस भारतात दाखल झाली आहे. केंद्र शासनाने ही लस उपलब्ध केल्यास आम्ही खरेदी करून नागरिकांचे लसीकरण केले जाईल. १८ ते ४४ या वयोगटातील नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या उत्साहाने समोर येत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचेही टोपे यांनी सांगितले.