corona virus : जालन्यात आलेल्या मुबईतील पोलिसास कोरोनाचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:32 PM2020-03-12T15:32:47+5:302020-03-12T15:33:45+5:30
स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू; विलगीकरण कक्षात उपचार
जालना : परतूर तालुक्यातील वाटूर येथील रहिवासी असलेले व मुंबई येथे कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्यास गुरूवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कोरोना संयशित म्हणून जालना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दाखल रूग्णाचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी सांगितले.
परतूर तालुक्यातल वाटूर येथील एक व्यक्ती मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे. ते गत काही दिवसांपूर्वी गावी परतले होते. मात्र, त्यांना शारीरिक त्रास होऊ लागल्याने गुरूवारी दुपारी १२ वाजता जालना येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तपासणीअंती त्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने दक्षतेसाठी जिल्हा रूग्णालयातील कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, डॉ. आर. एस. पाटील यांनी दिली.
रूग्णाचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ते तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. संबंधित संशयिताचा इस्त्राईल देशातील कमांडोंशी संपर्क आल्याने त्याला लागण झाली असावी, असा संशय आहे. तो नोकरीनिमित्त मुंबई येथे इस्त्राईल कमांडोंशी संपर्कात आल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आल्याचे डॉ. राठोड म्हणाले. संशयित रूग्णासंदर्भातची माहिती व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनाही देण्यात आल्याचे डॉ. राठोड म्हणाले. कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.