दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 03:00 PM2020-11-18T15:00:56+5:302020-11-18T15:05:42+5:30

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना दिवाळीची सुटी पूर्वीप्रमाणे मिळाली नाही.

Corona warriors vigilant even during Diwali; 24-hour ambulance service | दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा

दिवाळी सणातही कोरोना योद्धे सतर्क; २४ तास केली रुग्णसेवा

Next
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांनी सुटीचे नियोजन करून दिवाळी सणालाही कोरोनाच्या चाचण्या अविरत

जालना :  मार्च महिन्यापासून कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. असे असताना या आजाराशी आहे त्या औषधींचा वापर करून रुग्णांना दिलासा देत तर काही रुग्णांना अक्षरश: नवजीवन देत कोरोनायोद्धे अर्थात शासकीय तसेच खाजगी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे ऐन दिवाळीतही रुग्णसेवा करण्यात मग्न असल्याचे दिसून आले. 

दिवाळी म्हटले की, प्रत्येकजण आपापल्या परिवारासोबत सण साजरा करताे; परंतु यंदा किमान वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना दिवाळीची सुटी पूर्वीप्रमाणे मिळाली नाही. यासाठी काही जणांनी दिवाळीआधी सुटीचे  नियोजन केले होते. तर काही जणांनी दिवाळीत रात्र आणि दिवस पाळी ठरवून कर्तव्य बजावल्याचे सांगण्यात आले. जालन्यातील कोविड  सेंटरचा विचार करता, तेथील आयसीयूमध्ये आजही ६२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. यासह बाह्यरुग्ण विभागातील जनरल वॉर्डमध्ये शंभर ते  १५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे एवढी मोठी रुग्णसंख्या असताना आम्हाला दिवाळीची सुटी मिळणे कठीण होते; परंतु आम्ही दिवाळीपूर्वी सर्व स्टाफची बैठक घेऊन  प्रत्येकाला दिवाळी साजरी करता आली पाहिजे आणि रुग्णांकडेही दुर्लक्ष होऊ नये, असे नियोजन केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. 

कोरोनात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांची ॲन्टिजन तसेच आरटीपीसीआर चाचणी करून घेणे हा होय. यामुळे येथील प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनीदेखील सुटीचे नियोजन करून दिवाळी सणालाही कोरोनाच्या चाचण्या अविरत कशा राहतील, यावर भर दिला आहे. ज्याप्रमाणे शासकीय रुग्णालयात हे नियोजन केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर खाजगी कोरोना सेंटरचालकांनीदेखील केले असल्याचे सांगण्यात आले. आयएमएच्या सर्व डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवल्याचे सांगण्यात आले. 

कोरोनाकाळात लॅब टेक्निशियनला मोठे महत्त्व असते. लॅबमध्ये स्वॅब घेऊन त्यांची तपासणी करून त्यांचा अहवाल हा प्रथम आयएमसीआरकडे पाठवावा लागतो. तेथून मंजुरी आल्यावरच तो रुग्णांना कळविण्यात येतो. ही सर्व प्रोसेस सुरू ठेवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले तसेच आमच्या वरिष्ठांनी आम्हाला ऐन दिवाळीच्या काळातही जालन्यात राहून २४ तास उपलब्ध राहण्याच्या सूचना आहेत. आम्ही त्याचे पालन करीत आहोत.  
-विश्वनाथ नाईक, लॅब टेक्निशियन, जालना

Web Title: Corona warriors vigilant even during Diwali; 24-hour ambulance service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.