कोरोनाचा फटका; प्रवासी नसल्याने बस स्थानक पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:44+5:302021-04-23T04:32:44+5:30
जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने ...
जाफराबाद : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बस स्थानकात प्रवासीच येत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकही बस जाफराबादच्या बस स्थानकातून सुटली नाही. इतर वेळी केवळ जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या होतात. मात्र, आता एकही बस सुटत नसल्याने बस स्थानक ओस पडले आहे.
जाफराबाद बस स्थानकातून मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. दिवसभरात किमान ५० पेक्षा जास्त बस जाफराबादच्या बस स्थानकात येतात. तर जाफराबाद बस स्थानकातून जाफराबाद आगाराच्या ७० फेऱ्या येणे व जाणे दररोज होत होत्या. मात्र, जालना जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच जाफराबाद तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शासनाने कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या काळात बससेवेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही परवानगी अत्यावश्यक सेवेसाठीच लागू आहे. इतर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असा नियम शासनाच्या वतीने लागू करण्यात आला आहे. परिणामी, प्रवासी बस स्थानकाकडे फिरकलेच नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी असे कर्मचारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करून लागल्याने गेल्या काही दिवसांपासून जाफराबाद बस स्थानकातील बहुतांश बस बंद आहेत. परिणामी, जाफराबाद बस स्थानक ओस पडले आहे.
गेल्या वर्षी लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून वर्षभरात जाफराबाद आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने एसटी महामंडळाची आर्थिक घडी बसत होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे.
एन. चव्हाण, आगारप्रमुख