बाजारपेठेवर कोरोनाची छाया गडद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:47 PM2020-03-16T23:47:15+5:302020-03-16T23:47:34+5:30
कोरोना विषाणूचे परिणाम आता हळूहळू स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोना विषाणूचे परिणाम आता हळूहळू स्थानिक पातळीवर जाणवू लागले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह अन्य मोठ्या शहरातून बांधकाम क्षेत्रातील कामगार भीतीमुळे आपल्या गावी जात असल्याने स्टीलचे दर दोन दिवसात एक हजार रूपयांनी कमी झाले आहेत.
अन्य उत्पादनांवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. जालन्यातील बाजारपेठेतील गर्दी तुलनेने कमी झाली असून, आगामी काळात याचा प्रादुर्भाव वाढल्यास मोठी किराणा दुकाने आणि मॉल बंद होणार असल्याच्या धास्तीने किराणा साहित्य जास्तीचे भरून ठेवण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना विषाणूचा रूग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही. केवळ दोन जणांना संशयाच्या कारणावरून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत. असे असले तरी आता नागरिकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड होऊन अनेकजण घराबाहेर पडणे टाळतांना दिसून येतात. शहरातील रिक्षांमधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचे रिक्षा चालक संघटनेचे गोपी मोहिदे यांनी सांगितले. जालन्यातून मोठ्या प्रमाणावर घरबांधणीसाठीचे स्टील हे मुंबई, पुणे, नाशिक आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये जाते. परंतु तेथून मागणी कमी झाली असून, परदेशातून येणारा कच्चा माल अर्थात स्क्रॅबची आवक घटल्याने त्याच्या किमती वाढल्या आहेत.
परंतु उत्पादित स्टीलला मागणी नसल्याने किमती घसरून त्या दोन दिवसात ४३ हजार रूपयांवर आल्या आहेत. याच किमती मध्यंतरी ४५ हजार रूपये प्रति टनावर पोहोचल्या होत्या.
पुढाकार : घरीच बांधणार रेशीमगाठ
येथील स्टील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर अग्रवाल यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त स्वागत समारंभ हा १९ रोजी होणार होता. परंतु आता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी अग्रवाल परिवाराशी चर्चा केली. त्यातच खोतकरांनी स्वत:चे उदाहरण देत मुलगी आणि मुलाचा विवाह साध्या आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित केल्याचे सांगितले.
उद्योजकाच्या मुलाचा कार्यक्रम असल्याने हजारोंच्या संख्येने तेथे गर्दी होणार होती. परंतु जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलेल्या आवाहनाला आणि खोतकरांच्या आग्रहामुळे आपण आपल्या मुलाचा विवाह हा नियोजित वेळीच घरच्या घरी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती किशोर अग्रवाल यांनी दिली.
कोरोनाच्या धास्तीने अनेक विवाह समारंभ साध्या पद्धतीने करण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून आले.
शाळेची इमारत घेतली ताब्यात
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आंबा (ता.परतूर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. येथील २० खोल्यांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. तहसीलदार रूपा चित्रक यांच्यासह अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदेव नवल यांनी दिली.
४६ आठवडी बाजारांवर गंडांतर
जालना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जवळपास ४६ आठवडी बाजार भरतात. या आठवडी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील नागरिकांची ये-जा असते. व्यापारानिमित्त हा बाजार भरविला जातो. कोरोना विषाणूमुळे गर्दी होऊ नये, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्यामुळे आठवडी बाजारावरही जवळपास बंदी आणण्याचा निर्णय झाला आहे.
मास्क, हॅन्ड सॅनिटायझरची साठेबाजी नको
कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी मास्क, हॅन्ड सॅनिटायझरची कृत्रिम टंचाई करणाºयांवर व जादा दराने विक्री करणाºयांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी उत्पादने खरेदी करताना उत्पादन परवाना क्रमांकाची खातरजमा करावी, एन ९५ मास्क खरेदी करताना बिलाची मागणी करावी. अनधिकृत उत्पादित हॅन्ड सॅनिटायझर विक्री करणाºयांवरही कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे.