कोरोनाचा धुमाकूळ; जालना जिल्ह्यातील एकाच गावातील 67 जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 08:02 PM2020-12-04T20:02:31+5:302020-12-04T20:06:03+5:30
पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अंतिम संस्काराला जवळपास १५० ते २०० जणांनी हजरी लावली होती.
जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी असतांनाच जालना तालुक्यातील खणेपुरी गावात मागील आठ दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या गावातील ६७ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावात २५ नोव्हेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या अंतिम संस्काराला जवळपास १५० ते २०० जणांनी हजरी लावली होती. त्यातच गावात सप्ताहाचे आयोजनही करण्यात आले होते. सप्ताहानिमित्त सर्वच नागरिक एकत्र आले होते. तेव्हापासून गावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. २६ नोव्हेंबर रोजी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी १, सोमवारी ३५, मंगळवारी ५, बुधवारी १९ तर गुरूवारी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी असली तरी एकट्या खणेपुरीत आठ दिवसात ६७ रूग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी कारला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तीन पथकांमार्फेत नागरिकांची तपासणी केली जात आहे. गावात औषध फवारणी करण्यात आली असून, नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १५० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील ६७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वैद्यकीय अधिकारी एस. ए. रहिमाणी यांनी सांगितले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भेट
जालना तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी नुकतीच या गावास भेट दिली आहे. त्यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची दररोज तपासणी करण्याची सूचना देण्यात आली. गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्क वापरावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन खुणेपुरीचे ग्रामसेवक प्रकाश वाघ यांनी केले आहे.
आम्ही तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे गाव बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस कर्मचारी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. गावात ६७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ग्रामस्थांची तीन पथकांमार्फत दररोज तपासणी केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी.
- शीतल सोनी, तालुका आरोग्य अधिकारी, जालना