CoronaVirus : जालनावासीयांच्या चिंतेत भर; ‘त्या’ महिलेचा पाचवा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:30 AM2020-04-23T10:30:20+5:302020-04-23T10:30:53+5:30
महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल २१ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता.
जालना : शहरातील दु:खीनगर भागातील कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल २१ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. मात्र, बुधवारी रात्री त्या महिलेच्या स्वॅबचा पाचवा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असून, प्रशासनासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.
जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे ६ एप्रिल रोजी समोर आले होते. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रथम तीन वेळेस घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या चौथ्या तपासणीचा अहवाल मात्र, निगेटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनासह जिल्हावासियांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, अवघ्या काही तासातच परतूर तालुक्यातील शेलवडा येथील शेतवस्तीवर राहणा-या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दरम्यान, दु:खीनगर भागातील महिलेच्या स्वॅब पाचव्या वेळेस तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. मात्र, बुधवारी रात्री उशिरा पुन्हा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह महिला रूग्ण असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
६० जणांचे अहवाल प्रयोशाळेकडे
परतूर तालुक्यातील शेलवडा गावातील कोरोनाग्रस्त महिलेला प्रारंभी जालना येथील खासगी रूग्णायलात त्यानंतर शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या कालावधीत तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांसह २० कर्मचाºयांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. तसेच महिलेच्या पतीसह जवळपास ४० जणांचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.