coronavirus : जालन्यात कोरोना संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:39 PM2020-05-30T13:39:42+5:302020-05-30T13:42:57+5:30
शुक्रवारी मध्यरात्री कोविड रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
जालना/ आंबा : परतूर तालुक्यातील मापेगाव (बु.) येथील एका कोरोना संशयिताचा शुक्रवारी मध्यरात्री कोविड रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताच्या कोरोना स्वॅबचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
परतूर तालुक्यातील मापेगाव (बु.) पुनर्वसन येथे १९ मे रोजी एक व्यक्ती मुंबईहून आला होता. त्याला गावातील शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. २९ मे रोजी त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारासाठी जालना येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) त्याला ठेवण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. मयताच्या कोरोना स्वॅबचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, डॉ. झेड.एच.सय्यद, डॉ. शिवाजी निलवर्ण, डॉ. राऊत यांनी मापेगाव येथील क्वारंटाइन कक्षाला भेट दिली.