CoronaVirus : शिक्षण विभागाचा प्रयोग यशस्वी; जालन्यात ८७ हजार विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाईन चाचणी परिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 03:37 PM2020-04-24T15:37:29+5:302020-04-24T15:40:29+5:30
जिल्हाभरातील पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १ लाख ४६ हजार ९३२ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ८२० विद्यार्थी सदर परिक्षा देत आहे.
जालना : लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन चाचणी घेण्यात येत आहे. १ लाख ४६ हजार ९३२ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ८२० विद्यार्थी परिक्षा देत आहे. शिक्षण विभागाने केलेला हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहत सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळात शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. सर्वांना घरीच राहण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला.
त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच बंदच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बंदच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची आॅनलाइन चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्याच्या पालकाच्या मोबाईलद्वारे सदर चाचणी घेण्यात येत आहे. २१ एप्रिलपासून ही परिक्षा सुरू आहे. जिल्हाभरातील पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या १ लाख ४६ हजार ९३२ विद्यार्थ्यांपैकी ८७ हजार ८२० विद्यार्थी सदर परिक्षा देत आहे. यावरून जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी राबविलेला आॅनलाइन परिक्षा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.