CoronaVirus : जालन्यातील कोरोनाबाधित ‘त्या’ दोन महिलांचा डिजिटल एक्स-रे अहवालही चांगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:24 PM2020-04-27T21:24:32+5:302020-04-27T21:25:03+5:30
एका महिलेला लवकरच डिश्चार्ज मिळण्याची शक्यता;
जालना : कोरोना निगेटिव्ह अहवाल आलेल्या ‘त्या’ दोन महिलांचा डिजिटल एक्स- रे काढण्यात आला होता. त्याचा अहवालही समाधानकारक आला आहे. मात्र, शहरातील दु:खीनगर भागातील महिलेची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. तर परतूर तालुक्यातील शेलवडा येथील महिलेच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याने त्या महिलेला लवकरच डिश्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जालना शहरातील दु:खीनगर येथील कोरोनाग्रस्त महिलेचा व परतूर तालुक्यातील शेलवडा येथील एका कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचे सलग दोन अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांना महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. उपचारादरम्यान त्या महिलांचा डिजिटल एक्स- रे काढण्यात आला होता. त्याचा अहवालही सोमवारी समाधानकारक आला आहे. दु:खीनगर भागातील महिलेच्या एक्स- रेचा अहवाल ८० ते ९० टक्के समाधानकारक आला आहे. तर शेलवडा येथील महिलेचा अहवाल पूर्णत: चांगला आला आहे. मात्र, दु:खीनगर येथील ६५ वर्षीय महिलेच्या प्रकृतीत अद्याप अपेक्षित सुधारणा झालेली नाही. तर शेलवडा येथील महिला रूग्णाच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. त्यामुळे उपचारानंतर पुढील काही दिवसातच त्या महिलेला डिश्चार्ज मिळण्याची शक्यता रूग्णालयीन सूत्रांनी वर्तविली आहे.
जालना जिल्ह्यात आजवर ९३२ कोरोना संशयित आढळून आले आहेत. पैकी ८०८ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून, पुर्नतपासणीत त्या महिलांचे अहवाल नंतर निगेटिव्ह आले आहेत. तर ७८३ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला असून, चार स्वॅब रिजेक्ट करण्यात आले आहेत. तर उपचारानंतर आजवर ५४३ जणांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षात २९० जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यात शहरातील संत रामदास मुलांच्या शासकीय वसतिगृहात ४८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ४१, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात १८, मोतीबाग येथील वसतिगृहात १४, पोलीस प्रशिक्षण केंद्रात ११०, गुरू गणेश भवन येथे ३८, मंठा येथे १३ तर परतूर येथे ८ जणांना ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.