coronavirus : जालन्यात चार एसआरपीएफ जवानांचा कोरोनावर विजय; रुग्णालयातून मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 04:18 PM2020-05-14T16:18:26+5:302020-05-14T16:20:23+5:30
जालन्यात आजवर एका महिलेसह पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत
जालना : कोरोनामुक्त झालेल्या एसआरपीएफच्या चार जवानांना गुरूवारी दुपारी जालना येथील कोविड रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्या कोरोनामुक्त जवानांना निरोप दिला. जालन्यात आजवर एका महिलेसह पाच जण कोरोनामुक्त झाले असून, १२ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना जिल्ह्यात आजवर १७ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या शेलवडा येथील महिलेला २९ एप्रिल रोजी डिश्चार्ज देण्यात आला होता. मात्र, १ मे रोजी मालेगाव येथून परत आलेल्या चार जवानांसह सातोना येथील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रूग्णांवर १४ दिवस जिल्हा रूग्णालयातील कोविड रूग्णालयात उपचार करण्यात आले. पाच पैकी सातोना येथील कोरोना बाधित रूग्णाचा दुसरा अहवाल बुधवारी १३ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. तर त्या चार जवानांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या या चारही जवानांना गुरूवारी कोविड रूग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. एस. टी. कुलकर्णी, कोविड इन्चार्ज डॉ. संजय जगताप, डॉ. आशिष राठोड, डॉ. सर्वेश पाटील, डॉ. नितीन पवार यांच्यासह परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
दु:खीनगर मधील महिलेच्या प्रकृतीत सुधारणा
जूना जालना शहरातील दु:खीनगर मध्ये जिल्ह्यातील पहिली कोरोना बाधित महिला आढळून आली होती. त्या महिलेवर महिनाभरापासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्या महिलेला लवकरच डिश्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.