CoronaVirus News: प्रशासन, उद्योजकांनी राखली ऑक्सिजनची पातळी; ऑक्सिजनच्या जालना पॅटर्नचा उदय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 09:02 AM2021-06-02T09:02:12+5:302021-06-02T09:02:31+5:30

ल्पावधीत उभारले भलेमोठे साठवणूक प्लांट

CoronaVirus News Administration Entrepreneurs Maintain Oxygen Levels | CoronaVirus News: प्रशासन, उद्योजकांनी राखली ऑक्सिजनची पातळी; ऑक्सिजनच्या जालना पॅटर्नचा उदय

CoronaVirus News: प्रशासन, उद्योजकांनी राखली ऑक्सिजनची पातळी; ऑक्सिजनच्या जालना पॅटर्नचा उदय

Next

जालना : ‘साहेब कसेही करा; पण ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरचा बेड उपलब्ध करून द्या. नाहीतर माझे आई-वडील, भाऊ-बहीण जगूच शकत नाहीत. ते अत्यवस्थ आहेत साहेब’, अशी आर्त हाक गेल्या दोन महिन्यांत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी तसेच उच्चपदस्त अधिकारी आणि फॅमिली डॉक्टरांना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत ऐकण्यास मिळाली. परंतु, जालना याला अपवाद होते. कारण, प्रशासन आणि उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे ऑक्सिजनअभावी एवढे हाल कोणत्याच रुग्णाचे झाले नाहीत, हे वास्तव आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. रुग्णसंख्या खाली येण्याचे नाव घेत नव्हती. अनेकांची ऑक्सिजनची पातळी ही ९० पेक्षा खाली येत होती. तातडीने कुठले ना कुठले रुग्णालय गाठून ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरचा बेड मिळविण्यासाठी रुग्णांची जी ओढाताण झाली, ती केवळ ज्यांच्या घरी या कोरोनाने शिरकाव करून कर्ता पुरुषच कवेत घेतला होता, त्यांना ती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सर्वत्र धावाधाव आणि शहरातील बहुतांश रस्त्यांवरून रुग्णवाहिकांचे सायरन असे चित्र दिवसरात्र दिसत होते. परंतु, अशाही स्थितीत जालन्यात ऑक्सिजनअभावी कुठल्याच रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही बाब सकारात्मकच म्हणावी लागेल.

दुसरी लाट ही अत्यंत गंभीर असणार, याचा सुगावा आधीच तज्ज्ञांनी दिला होता. त्यामुळे त्यांचा सल्ला गंभीरतेने घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष ठेवत असताना स्वत:च्या जिल्ह्याकडे अधिकचे लक्ष दिले. गेल्या जुलै महिन्यात कोविड हॉस्पिटलमध्ये ६० लाख रुपये खर्च करून लिक्विड ऑक्सिजन साठवणुकीचा प्लांट  उभारला. यासाठी महिको कंपनीने सीएसआरमधून हा निधी दिला. तसेच स्टील असोसिएशन, रोटरी, लायन्स क्लब आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांनी या संकटाच्या काळात हात सैल सोडून मिळेल ती मदत केल्यानेच जालन्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही. 

कोविड हॉस्पिटलसोबतच जिल्हा रुग्णालयातही दुसरा ऑक्सिजन साठवणुकीचा प्लांट उभारला. ऐनवेळेवर येथील पोलाद स्टीलने १८ दिवसांत ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारून दररोज २५० सिलिंडर रुग्णांना मोफत दिले. तसेच आता ओमसाईराम, एसआरजे स्टील, कालिका स्टील यांनीही अल्पावधीत    ऑक्सिजन प्लांट उभारले आहेत. त्यातील ६० टक्के सिलिंडर हे गरज पडल्यास कोरोना रुग्णांसाठी देण्याच्या अटीवरच हे प्लांट सुरू केल्याचे सांगण्यात आले.

तब्बल सहाशे बेड
जालना कोविड हॉस्पिटल तसेच जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागात मिळून शासकीय पातळीवर ऑक्सिजनचा पुरवठा करणारे जवळपास ६०० पेक्षा अधिक बेड उपलब्ध होते. आज जवळपास ७५ टक्के ऑक्सिजनचे बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ६० हजार २६२ जणांंना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ५८ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

Web Title: CoronaVirus News Administration Entrepreneurs Maintain Oxygen Levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.