Coronavirus : जालन्यात आणखी नऊ कोरोना बाधित; चौघांना डिस्चार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:46 PM2020-05-27T20:46:46+5:302020-05-27T20:47:03+5:30
६३ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार
जालना : शहरातील एका खाजगी रूग्णालयातील तिघांसह नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील एकाचा अहवाल मंगळवारी मध्यरात्री उशिरा आला. तर उर्वरित आठ जणांचा अहवाल बुधवारी आला आहे. उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या चौघांना कोविड रूग्णालयातून बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ८५ वर गेली आहे.
मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणाहून जालना जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दिवसभरात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रात्री उशिरा जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील एका २७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दुसºया दिवशी बुधवारी दिवसभरात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील एका खासगी रूग्णालयातील तीन कर्मचाºयांचाही समावेश आहे. तसेच मुंबईहून नूतनवाडी (ता.जालना) येथे आलेल्या ५५ वर्षीय महिलेचा, चांदई एक्को येथील ३६ वर्षीय पुरूषाचा, तर एका १२ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. छत्तीसगड येथून खापरदेव हिवरा (ता. जालना) येथे आलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा तसेच पिरगैबवाडी (ता.अंबड) येथील ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोविड रूग्णालयातील उपचारानंतर एसआरपीएफचे तीन जवान व कानडगाव (ता.अंबड) येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या चौघांना बुधवारी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, १४ दिवस होमक्वारंटाइन राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. जालना जिल्ह्यात आजवर ८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर उपचारानंतर २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित ६३ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी सांगितले. सुदैवाने कोरोनामुळे जिल्ह्यात एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.