CoronaVirus : लाईट नाही, जवळ गाडी नाही...अखेर महिला मजुराने झोपडीतच दिला बाळाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 02:22 PM2020-04-23T14:22:19+5:302020-04-23T14:24:54+5:30
आरोग्य विभागाला अद्याप नाही पत्ता
पारडगाव : लॉकडाऊनमुळे पारडगाव येथे अडकलेल्या एका महिलेने राहत्या झोपडीतच एका बाळाला जन्म दिला. ही घटना सोमवारी घडली असून, परिसरातील नागरिकांनी मजूर कुटुंबाला अन्नधान्याची मदत केली.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील रेल्वे पटरीच्या कामावर मध्यप्रदेश राज्यातील मजूर आले होते. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि हे मजूर घराकडे जाऊ शकले नाहीत. पारडगाव शिवारातील झोपडीत राहून हे मजूर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तेथील मुन्नीबाई पवार नामक २३ वर्षीय महिलेने सोमवारी पहाटेच्या सुमारास झोपडीतच एका बाळाला जन्म दिला. रात्रीच्यावेळी तिला त्रास होत होता. मात्र, जवळ वाहन नव्हते. त्यात वीज नसल्याने फोनही बंद पडले होते. अशा कठीण परिस्थितीत त्या महिलेची झोपडीतच प्रसुती झाल्याचे लखन पवार यांनी सांगितले. आईसह बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर परिसरात राहणारे राजू स्वामी, विभुते यांनी त्या कुटुंबाला मदत केली. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाच्या पथकाने त्या महिलेची, बाळाची तपासणी केली नव्हती.
गावी जाण्याची सोय करा
आम्ही कामानिमित्त इकडे आलो होतो. मात्र, लॉकडाऊनमुळे अडकलो आहोत. आम्हाला आमच्या घरी जायचे असून, प्रशासनाने आम्हाला घरी जाण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.
- मुन्नीबाई पवार, मजूर, पारडगाव (मध्यप्रदेश)