coronavirus : जालन्यात कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर; आणखी १३ जणांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:44 PM2020-06-06T22:44:31+5:302020-06-06T22:45:16+5:30
उपचारानंतर ८८ जण झाले कोरोनामुक्त
जालना : जालना शहरातील चौघांसह जिल्ह्यातील एकूण १३ जणांचा कोरोना अहवाल शनिवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला. दरम्यान, शनिवारी सकाळी कोरोनामुक्त झालेल्या सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जालना शहरातील संभाजी नगर मधील एक महिला, काद्राबाद मधील एक व्यक्ती, शंकरनगर मधील एक पुरूष, बालाजी नगर मधील एका पुरूषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जाफराबाद येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात एक महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे. घनसावंगी तालुक्यातील यावलपपिंपरी येथील महिलेचा तर घनसावंगी तालुक्यातीलच पांगरा येथील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन महिला व दोन पुरूषांचा समावेश आहे.
आजवर जिल्ह्यात एकूण १९८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. तर उपचारानंतर कोरोनामुक्त ८८ जणांना कोविड रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित १०६ जणांवरउपचार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, वाढणारी रूग्णसंख्या पाहता नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.