coronavirus : कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी पाच जिल्ह्यांत सुरू होणार टेली आयसीयू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 02:13 PM2020-08-25T14:13:51+5:302020-08-25T14:26:17+5:30
याद्वारे दिल्ली व इतर ठिकाणी असलेले विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून आयसीयूतील कोरोना रूग्णांची दिवसातून तीन वेळेस पाहणी केली जाणार आहे.
जालना : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे टेली आयसीयू ही सेवा यशस्वीरीत्या राबविण्यात आली. त्याच धर्तीवर गुरुवारपासून राज्यातील जालना, औरंगाबाद, जळगाव, अकोला आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांत गुरुवारपासून ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जालना येथे दिली.
यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेत रुग्णालयातील आयसीयूमध्ये कॅमेरा ठेवला जाणार आहे. याद्वारे दिल्ली व इतर ठिकाणी असलेले विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडून आयसीयूतील कोरोना रूग्णांची दिवसातून तीन वेळेस पाहणी केली जाणार आहे. रूग्णांची तपासणी, औषधोपचार आदींची माहिती घेऊन हे तज्ज्ञ औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
#coronavirus या सर्वेक्षणात टेस्ट केलेल्या लोकांची वय, लिंगानुसार तपासणी केली जाणार आहे.https://t.co/yimoUJs6Yo
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) August 25, 2020
ही सेवा मेडस्केप एनजीओ आणि वूई डॉक्टरर्स नावाचा कॅम्पेनच्या माध्यमातून सुरू होत आहे. या सेवेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे. ही सेवा सर्वत्र सुरू झाली तर तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग होणार असून, त्यातून राज्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर कमी होईल, असा विश्वासही टोपे यांनी व्यक्त केला.