coronavirus : जालना जिल्ह्यात कोरोनाचा तेरावा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 09:37 PM2020-06-25T21:37:11+5:302020-06-25T21:38:03+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४०७
जालना : शहरातील सदरबाजार परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मयत महिलेसह एकूण नऊ जणांचा अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आला. तर यशस्वी उपचारानंतर १० जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जालना शहरातील सदरबाजार परिसरातील एका ५५ वर्षीय महिलेला न्युमोनियाचा आजार असल्याने २३ जून रोजी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना २४ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्या महिलेचे स्वॅब घेण्यात आले होते. मयत महिलेसह एकूण नऊ जणांचे अहवाल गुरूवारी पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जिल्हा क्षयरोग रुग्णालयात कार्यरत असलेले दोन कर्मचारी, जिल्हा सरकारी रुग्णालय परिसरात असलेल्या निवास स्थानातील एक, जालना शहरातील हनुमान नगर परिसरातील एक, सदरबाजार बाजार परिसरातील एक (मयत महिला), कालीकुर्ती परिसरातील एक, वैभव कॉलनी परिसरातील एक, जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील एक, जाफराबाद तालुक्यातील भारज येथील एक अशा एकूण नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या दहा जणांना गुरूवारी सकाळी रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यात जालना शहरातील गुडला गल्ली तीन, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन मधील तीन जवान, भाग्यनगर परिसरातील दोन, बालाजी नगर परिसरातील एक, भराडखेडा (ता. बदनापूर) येथील एक अशा एकूण दहा जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात आजवर एकूण ४०७ कोरोना बाधित रूग्ण आढळले असून, त्यातील १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर २८७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.