coronavirus : जालन्यात दोघांचा बळी; ३३ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:25 PM2020-06-30T21:25:38+5:302020-06-30T21:27:19+5:30
जालना जिल्ह्यात बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.
जालना : जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे आजवर १५ जणांचा बळी गेला असून, बाधितांची संख्या ५५४ वर गेली आहे.
जालना शहरातील मंठा चौफुली परिसरातील ८५ वर्षीय व्यक्तीस न्युमोनियाचा त्रास असल्याने २७ जून रोजी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच शहरातीलच नरिमननगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याने व इतर त्रास असल्याने २८ जून रोजी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दोन्ही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना दोन्ही रूग्णांचा मंगळवारी सकाळीच मृत्यू झाला.
तर मंगळवारी एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या बाधित रूग्णांमध्ये विणकर मोहल्ला भागातील सात, हॉटेल अमित जवळील तीन, वसुंधरानगर परिसरातील तीन, संजोग नगर मधील दोन, मस्तगड येथील एक, भरत नगर येथील एक, व्यंकटेशनगर येथील एक, जेपीसी बँक कॉलनीतील एक, बरवार गल्लीतील एक, संभाजी नगरमधील एक, सतकरनगर मधील एक, अकेली मस्जिद जवळील एक, मिशन हॉस्पिटल रोडवरील एक, मंगळबाजार मधील एक, नरीमननगर मधील एक (मयत), खडकपुरा येथील एक, दानाबाजार येथील एक, पानशेंद्रा (ता.जालना) येथील एक, टेंभुर्णी (ता.जाफराबाद) येथील चार अशा एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर मंगळवारी १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ९, अंबड शहरातील चांगलेनगर मधील एक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीनमधील एक जवान, मंगळबाजार मधील दोन, संभाजीनगर मधील दोन अशा एकूण १५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५५४ वर गेली असून, त्यातील १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ३५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.