Coronavirus : जालन्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण; बाधितांची संख्या २५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:56 AM2020-05-16T10:56:48+5:302020-05-16T10:58:34+5:30
शुक्रवारी रात्री एकूण सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला
जालना : शहरातील एका खासगी रूग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यासह मुंबईहून पेवा (ता.मंठा) येथे आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी रात्री समोर आले. शुक्रवारी रात्री एकूण सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, जालना जिल्ह्यातील बाधितांची संख्या २५ वर गेली आहे. तर ७ जण कोरोनामुक्त झाले असून, १८ जणांवर उपचार सुरू आहेत.
जालना येथील कोविड रूग्णालयातून कोरोनामुक्त दोन महिलांना शुक्रवारी दुपारी डिश्चार्ज देण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी रात्रीच्यावेळी प्रथमत: पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात मालेगाव येथून परत आलेल्या एसआरपीएफच्या चार जवानांचा समावेश होता. तर एका खासगी रूग्णालयातील डॉक्टरालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते.
शुक्रवारी रात्री उशिरा खासगी दवाखान्यातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यासह मुंबईहून पेवा (ता.मंठा) येथे आलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकाच रात्रीत सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.