महामंडळाला ६५ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:00 AM2019-04-13T00:00:59+5:302019-04-13T00:01:17+5:30
निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली आहे.
विकास व्होरकटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी तर १८ एप्रिल रोजी परभणी मतदारसंघात मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनसह इतर साहित्य वेळेवर पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली आहे. यासाठी निवडणूक विभागाने महामंडळाला ६५ लाखांचे रुपये दिले असून, ही रक्कम नुकतीच महामंडळाकडे जमा करण्यात आली.
दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात जालना जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. तर तिसºया टप्प्यात म्हणजेच २३ एप्रिल रोजी जालना लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या दिवशी दोन हजार मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनसह इतर साहित्य वेळेवर पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली होती. महा मंडळाने निवडणूक विभागाला १५४ बसेस दिल्या. यात दुस-या टप्प्यातील परभणी लोकसभेसाठी ७१ बस सज्ज झाल्या आहेत. तिस-या टप्प्यातील जालना लोकसभेसाठी ८३ बस लागणार आहेत.
असे असणार नियोजन
या सर्व बस मतदानाच्या एक दिवसाअगोदर सायंकाळी दोन हजार मतदान केंद्रावर बॅलेट युनिट, सीयु मशीन, आणि व्हीव्हीपॅट दोन हजार २५७ मशीन घेऊन जाणार आहे. तसेच मतदान झाल्यानंतर दुस-या दिवशी सायंकाळी या बस साहित्य घेऊन परत येणार आहेत. निवडणूक विभागाकडून या बसला प्रासंगिक करारानुसार पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी बसला ४८ रूपये किलोमीटर यानुसार दर ठरलेले आहेत. पण, सध्या स्थितीत निवडणूक विभागाने एस. टी. महामंडळाकडे ६५ लाख जमा केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.