मुख्याधिकाऱ्यांना फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:50 AM2018-06-03T00:50:42+5:302018-06-03T00:50:42+5:30
काही मोजक्या नगरसेवकांच्याच कामांना तांत्रिक व वित्तीय मान्यता मिळत असल्याच्या मुद्यावरून शनिवारी भाजपाचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : काही मोजक्या नगरसेवकांच्याच कामांना तांत्रिक व वित्तीय मान्यता मिळत असल्याच्या मुद्यावरून शनिवारी भाजपाचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. मुख्याधिका-यांनी नगरसेवक ढोबळे यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जालना पालिकेत विविध विकास कामांच्या मुद्यावरून विरोधी नगरसेवक आणि प्रशासनात किरकोळ स्वरूपाचे वाद ही नित्याचीच बाब झाली आहे. काही मोजक्या व बाहुबली नगरसेवकांची कामे बिनबोभाट होत आहेत. या मुद्याला धरून नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी शनिवारी पालिकेत येऊन मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या सोबत प्रथम चर्चा केली. मात्र, त्यातून काहीच हाती लागत नसल्याचे पाहून सोबत बाटलीत आणलेली शाई त्यांच्या तोंडाला लावून फासले. हा प्रकार घडला त्यावेळी नुकतीच स्थायी समितीची सभा पार पडली होती. त्यामुळे नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत व अन्य पदाधिकारी पालिकेतच होते. उपनगराध्यक्ष राऊत यांनी तातडीने मुख्याधिका-यांच्या दालनाकडे धाव घेत ढोबळे यांना समाजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्याधिकारी व ढोबळे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता.
या घटनेनंतर मुख्याधिकारी खांडेकर यांनी थेट कदीम जालना पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवक ढोबळे विरूध्द शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दिली. यावेळी पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी देखील ठाण्यात आले होते. तसेच नगरसेवक ढोबळे व त्यांचे समर्थकही ठाण्यात जमा झाले होते. यावेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी मध्यस्ती करून घोषाबाजी थांबवली.
कर्मचा-यांचे कामबंद
या प्रकारानंतर जालना पाकिलेतील अधिकारी, कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केल्याने दुपारनंतर पालिकेत शुकशुकाट होता. नगरसेवक ढोबळें विरूध्द मुख्याधिका-यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.