भोजन योजनेतील भ्रष्टाचार चिंताजनक- राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:10 AM2020-02-06T01:10:42+5:302020-02-06T01:11:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून भारतीय संस्कृतीत ओळखले जाते. मध्यंतरी देशभर फिरत असताना सरकारने सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अन्न हे पूर्णब्रह्म म्हणून भारतीय संस्कृतीत ओळखले जाते. मध्यंतरी देशभर फिरत असताना सरकारने सुरू केलेल्या या विद्यार्थ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनेतही भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून आले. यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. ही चिंताजनक बाब असून, याचे आपल्याला अश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सर्वांनी पारदर्शकतेला महत्त्व देण्याचे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल कोशियारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना येथील महिको आणि इस्कॉनतर्फे चालविण्यात येणाºया अन्नामृत पोषण आहार योजनेच्या अद्ययावत स्वयंपाकगृहाचे बुधवारी अनावरण करण्यात आले. पुढे बोलताना कोश्यारी म्हणाले, भारत ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. मनुष्य आणि प्राण्यांमध्ये मोठा फरक आहे. काही तत्त्ववेत्यांनी मानवाला सोशल प्राणी म्हणून संबोधले आहे. परंतु, मानव आणि अन्य प्राण्यांमध्ये मोठा फरक आहे. अन्नग्रहण करण्यासाठी प्राणी जंगलात भटकत असतात. परंतु, मानवाला मात्र तशी गरज नाही. परोपकारी वृत्ती हा मानवी स्वभाव आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी त्याला स्वार्थ जडल्याचे दिसून येते. संतांनी परोपकार कसे करावेत, हे सांगून ठेवले आहे. परंतु त्याचा विसर पडलेला दिसत आहे.
मानवाने परोपकार करताना निसर्गाचेही संवर्धन करून वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगणे हेच मानवी ध्येय असले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकारकडून शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासाठी मध्यान्नभोजन योजना सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाढ झाली आहे. परंतु, मंत्री आणि खासदार असताना देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना या योजनेतही अनेकजण गैरव्यवहार करतात. हे निदर्शनास आल्यावर मोठे आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. देशातील भ्रष्टाचारामुळे तत्कालीन पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनीही देशातील एक रूपयापैकी केवळ १५ पैसेच हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात, यावरूनच त्यांनी त्यावेळची स्थिती विशद केली होती.
उपक्रम : १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
प्रास्ताविक इस्कॉनचे डॉ. राधाकृष्ण प्रभू यांनी केले. त्यांनी इस्कॉनचे प्रणेते प्रभूपाद यांच्या पश्चिमबंगालमधील मायापूर येथील अनुभवाचा किस्सा सांगितला. मायापूरमध्ये एका कचराकुंडीजवळ फेकलेले अन्न गोळा करण्यासाठी लहान मुले कशी धडपड करीत होते आणि त्यांच्या अंगावर कुत्रे भुंकतानाचे विदारक चित्र प्रभूपाद यांनी टिपले.
त्यानंतर इस्कॉन केंद्राच्या दहा किलोमीटर परिसरात कोणीही मुलगा अथवा माणूस भूकेला राहू नये, यातूनच २००४ साली मुंबईत प्रथम ९०० मुलांसाठी खिचडी वाटून या अन्नामृत प्रकल्पाचा प्रारंभ झाल्याचे सांगितले. आजघडीला १२ लाख विद्यार्थ्यांना या अन्नामृत योजनेतून ८ राज्यात पोषण आहार पुरविला जात असल्याचे डॉ. राधाकृष्ण प्रभू म्हणाले.
जिल्ह्यातील एक लाख विद्यार्थ्यांना
देणार पौष्टिक आहार
यावेळी महिकोचे संचालक राजेंद्र बारवाले यांनी वडील बद्रीनारायण बारवाले यांच्या सांगण्यानुसार आपण जालन्यात उद्योगाच्या माध्यमातून चार कोटी रूपयांचे सोशल (सीएसआर) मधून गोल्डन ज्युबिली या परिसरात इस्कॉनच्या अन्नामृत योजनेचा श्रीगणेशा केला आहे. भविष्यात जिल्हाभरातील एक लाख विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार विविध शाळांमधून देण्याचीही आमची योजना असल्याचे सांगून यासाठी इस्कॉनकडून जी मदत झाली त्याबद्दल त्यांनी आभार मानले.