रोहयो कामात गैरव्यवहार - चंद्रकांत दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:45 AM2018-06-24T00:45:20+5:302018-06-24T00:48:15+5:30
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांच्या दबावाखाली सरकारी यंत्रणा काम करत असल्याचेही चंद्रकांत दानवे यांनी सांगितले.
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात रोहयोतून लाखो रूपयांची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असल्याबद्दल आमचा आक्षेप नाही. परंतु, जी कामे सुरू आहेत, ती करताना शासनाच्या निकषाचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. अनेक ठिकाणी जेसीबी, पोकलेनचा उपयोग करून कामे उरकण्यात आली आहेत. एक कि़मी. पाणंद रस्त्यासाठी शासनाच्या निकषानुसार सरासरी चार लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतू, या कामासाठी चक्क २४ लाख रूपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून, असे जवळपास १४९ प्रस्ताव आहेत. या कामांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडून मस्टर मंजूर करण्यात आले आहेत.
अनेक धनदांडग्यांना मजूर दाखवण्यात आल्याचा आरोपही दानवे यांनी केला. जे मजूर दाखवले आहेत, त्यातील काहीजण तर रामेश्वर सहकारी साखर कारखान्यात कामाला असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या नावांची यादीही त्यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. प्राप्तीकर भरणा-यांनाही मजूर दाखवून त्यांच्यावर पैसे उचलण्यात आल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. तत्पूर्वी आयुक्त, जिल्हाधिका-यांकडेही तक्रारी दिल्या. मात्र, आमच्या ज्या अधिकाºयांविरूध्द तक्रारी आहेत, त्यांनाच चौकशी करण्यासाठी नेमण्यात येत असल्याने त्यातून काय साध्य होणार असा सवाल करून या सर्व कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुधाकर दानवे, लक्ष्मण ठोंबरे, राजेश म्हस्के, भास्कर घायवट यांची उपस्थिती होती.
आरोपात तथ्य नाही : संतोष दानवे
पाणंद रस्ते हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्याच महिन्यात या संदर्भातील शासन आदेश रोजगार हमी विभागाकडून निघाला आहे. त्यात दिलेल्या निकषांप्रमाणेच आम्ही रस्त्यांची कामे करत आहोत. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात होत असलेला सर्वांगीण विकास विरोधकांना देखवत नसल्यानेच आमच्यावर हे आरोप केले जात आहेत. हे आरोप त्यांनी आताच कसे केले हा संशोधनाचा विषय असून, त्यांचा बोलविता धनी दुसराच असल्याचे आ. संतोष दानवे यांनी सांगितले.