रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:32 AM2020-02-13T01:32:20+5:302020-02-13T01:33:04+5:30
शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून जागेवरच थांबले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून जागेवरच थांबले आहे. नवीन रस्ता तयार करण्यासाठी बांधकाम विभागाने दोनदा निविदा काढत या रस्त्याचे काम करण्यासाठी मुख्य रस्ता हा जागतिक बँकेकडे सोपविला असल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार कधी, असा प्रश्न जाफराबादकरांना पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेला शहरातील मुख्य हा रस्ता राहिला नसून, तो पाणंद रस्ता बनला आहे. नव्याने रस्ता करण्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबरीकरण असलेला रस्ता काही वर्षांपूर्वी खोदून टाकलेला आहे. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.
शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकापासून शिवाजी चौक ते पूर्णा नदीकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे खोदून काम सुरूही झाले होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून काम मध्येच थांबले. त्यामुळे व्यापारी आणि ग्रामस्थांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीत जाफराबाद- माहोरा, जाफराबाद- टेंभुर्णी व शहराबाहेर रस्त्याचे काम सुरू आहे. शहरामधील नऊशे मीटरचे काम दुस-याच एजन्सीला देण्यात आले असून, या रस्त्याचे काम आमच्याकडे नसल्याचे बांधकाम विभाग सांगत आहे. त्यामुळे अजून किती दिवस या रस्त्याच्या प्रश्न खितपत राहणार, हे अनुत्तरित आहे. सद्यस्थितीत असलेल्या रस्ता अवैध व्यावसायिकांनी व्यापून टाकला आहे. यात पार्किंग सुविधा नसल्याने रस्त्यावरच वाहनधारक आपली वाहने उभी करत आहे. याकडे पोलीस प्रशासनासह नगर पंचायतचे दुर्लक्ष होत आहे. एकूणच रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.