पाण्याच्या मुद्द्यावरून नगरसेवक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:57 AM2020-02-05T00:57:45+5:302020-02-05T00:58:07+5:30
महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने जायकवाडी योजनेची पाईपलाईन फुटल्याने जुना जालना भागाचा पाणीपुरवठा महिन्याभरापासून ठप्प झाला आहे. याच मुद्यावर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नागरिकांना महिन्याभरापासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगरपालिकेच्या वतीने कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा का केला जात नाही, असा सवाल करत नगरसेवकांनी आयोजित न.प.च्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला.
नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सर्व सभापती, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक शहा आलम खान यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. महिन्याभरापासून जुना जालना भागाला पाणी नाही. पाणी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आली नाही. घाणेवाडी तलावातून शहराला पाणीपुरवठा का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर महावीर ढक्का यांनीही पाण्याचा मुद्दा उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर मुुख्याधिका-यांनी जायकवाडी योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याचे सांगून आजपासून पाणीपुरवठा सुुरळीत होईल, असे सांगितले.
स्वच्छता, वाढीव कर आकारणी, गळती, खातेप्रमुखांची गैरहजेरी इ. मुद्यांवरून नगरसेवकांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळातच विषयपत्रिकेवरील १५ विषयांसह आयत्या वेळच्या दोन विषयांना मंजुरी देऊन सभेचा समारोप केला. नगरसेवक विष्णू पाचफुले, आरेफ खान, शेख शकील, फारूख तुंडीवाले, जयंत भोसले, अरूण मगरे, वैशाली जांगडे, रफिया बेगम, मीना घुुगे आदींनी प्रश्न मांडले. पिंटू रत्नपारखे यांनी केशव कानपुडेंचा मुद्दा उपस्थित करून धारेवर धरले.
अधिकारी : कर्मचा-यांवर वचकच नाही
नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे कार्यालयात नसल्यावर कोणातही अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. अधिकारी कामचुकारपणाही करतात. मुख्याधिका-यांचा अधिकारी व कर्मचा-यांवर वचकच राहिला नसल्याचे नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी सांगितले.
याला उत्तर देताना मुख्याधिकारी म्हणाले की, जे अधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
वाढीव कर आकारणीमुळे नागरिक हैराण
नगर परिषदेच्या वतीने यावर्षी नागरिकांकडून वाढीव कर आकारणी करण्यात येत आहे. परंतु, यातही अधिकारी व कर्मचारी हात साफ करून घेत आहेत. गतवर्षी ७०० रूपयांचा कर असताना यावर्षी २ लाखांचा कर भरून घेतला जात आहे. कर कमी करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.