पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांकडून समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:18 AM2020-03-05T00:18:16+5:302020-03-05T00:18:39+5:30
पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे. गत १४ महिन्यांत कक्षात दाखल ८६९ तक्रारींपैकी ३९२ प्रकरणांत यशस्वी तडजोड करून वाद मिटविण्यात आले आहेत.
विविध कारणांनी पती- पत्नीत होणारे वाद आणि त्यात सासर- माहेरच्या मंडळींकडून होणारा हस्तक्षेप यामुळे हे वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत जातात. ठाण्यात आलेल्या तक्रारी प्रारंभी महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे वर्ग केल्या जातात. या कक्षातील अधिकारी, कर्मचारी पोटतिडकीने समुपदेशन करून पती- पत्नीमधील वाद मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. जालना येथील कक्षात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गत १४ महिन्यांमध्ये दाखल ८६९ पैकी ३९२ तक्रारींचा निपटारा केला आहे.
सन २०१९ मध्ये या कक्षात ७४९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यात जिल्ह्यातील ३९६ तर बाहेरील जिल्ह्यातील ३५३ तक्रारींचा समावेश होता. या क्षात झालेल्या समुपदेशनामुळे ३८१ पती-पत्नींचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा फुलविण्यात संबंधितांना यश आले आहे. १९२ प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आली असून, १८ प्रकरणात कोर्ट समज देण्यात आली आहे. एकूण ५९१ प्रकरणे गत वर्षात निकाली काढण्यात आली आहेत. तर १५८ प्रकरणे प्रलंबित आहेत. चालू वर्षात २०२० मध्ये केवळ दोन महिन्यातील ६० दिवसात तब्बल १२० तक्रारी या कक्षात दाखल झाल्या आहेत. यात जालना जिल्ह्यातील ६५ तर बाहेरील ५५ तक्रारींचा समावेश आहे. यापैकी ११ प्रकरणात समुपदेशनामुळे यशस्वी तडजोड करण्यात आली आहे. तर इतर प्रकरणे प्रलंबित आहेत.
पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे काम सुरू आहे. कक्षातील प्रमुख पोउपनि एस.बी.राठोड यांच्यासह पोहेकॉ एम.ए.गायकवाड, पोना एस.एस.राठोड, आर.टी. गुरूम, एम.आर.शेख, एस.आर. बोरडे हे कर्मचारी तक्रारींमध्ये यशस्वी समुपदेशन करीत असून, कक्षाशी निगडीत असलेल्या समितीतील इतर सदस्य, कायदे तज्ज्ञांचीही मदत होत आहे.
मोबाईलचा अतिवापर, संशयी वृत्ती, स्वतंत्र राहण्याची मागणी, हुंड्यासह पैशाची मागणी नवºयाचे व्यसन, सासर- माहेरच्यांचा वाढता हस्तक्षेप यासह इतर कारणांनी पती- पत्नींमध्ये वाद होत आहेत. या कक्षात दाखल होणाºया तक्रारींमध्ये हीच अधिक कारणे दिसून येतात.