भावाकीने केला घात; शेतीच्या वादातून कुऱ्हाड, तलवारीने वार करून शेतकऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 05:45 PM2020-11-21T17:45:32+5:302020-11-21T17:51:30+5:30
पाच जणांनी शेतीचा वाद आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला
जालना : शेतीच्या वादातून एकावर कुऱ्हाड, तलवारीचे वार करून खून केल्याची घटना मांडवा (ता. बदनापूर) येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी मयताच्या भावासह पाच जणांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतन गिरजाजी खंडाळे (६०, रा. मांडवा, ता. बदनापूर) असे मयताचे नाव आहे. मांडवा येथील रतन खंडाळे यांनी शेतातील बकऱ्या विकल्या होत्या. त्या बकऱ्यांचे दीड लाख रुपये त्यांच्याकडे आले होते. गावातील पाटलांकडून हात उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी रतन खंडाळे हे शुक्रवारी दुपारी दुचाकीवरून गावात जात होते. त्यावेळी पाच जणांनी शेतीचा वाद आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून रतन खंडाळे यांची दुचाकी अडविली. तसेच त्यांच्यावर कुऱ्हाड, तलवारीने वार करून त्यांचा खून केला.
शिवाय त्यांच्याकडील दीड लाख रुपये घेऊन पाच जणांनी पळ काढल्याचे मयताचा मुलगा गौतम रतन खंडाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गौतम खंडाळे यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबक गिरजाजी खंडाळे, रवी त्र्यंबक खंडाळे, गणेश त्र्यंबक खंडाळे, सतीश त्र्यंबक खंडाळे, संदीप उत्तम खंडाळे (सर्व रा. मांडवा, ता. जालना) यांच्याविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक बोंडले, हवालदर वाघमारे, पोकॉ. अनिल चव्हाण, अनिल काळे, वाहनचालक परमेश्वर हिवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संशयित पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा रूग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश
घटनेनंतर नातेवाईकांनी जखमीला तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. मयताच्या पार्थिवाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता.